टाचदुखी ही आपल्यादृष्टीने अतिशय सामान्य समस्या असते. म्हणून आपण त्याकडे म्हणावे तसे लक्ष देत नाही. पण कालांतराने ही समस्या मोठी होत जाते आणि आपले जगणे अवघड करते. दिवसभर उभे राहून काम करताना, किंवा घरात, बाहेर वावरताना आपल्याला हे लक्षात येत नाही. मात्र अनेकदा सकाळी उठल्यावर आपल्याला टाच किंवा पाय जमिनीवर टेकवताच येत नाही (Home Remedies for Heel Pain).
बरेच दिवस आपण हे दुखणे अंगावर काढतो, मात्र कालांतराने हा त्रास वाढत जातो. अशावेळी काय करायचे हे आपल्याला समजत नाही आणि आपण डॉक्टरांकडे धाव घेतो. हा त्रास कमी व्हावा यासाठी आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मिहीर खत्री २ सोपे उपाय सांगतात. हे उपाय नियमित केल्यास त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. ४ ते ५ आठवडे हे उपाय केल्यास टाचदुखी नक्कीच कमी व्हायला मदत होते असे डॉ. खत्री यांचे म्हणणे आहे.
१. काढा रात्री झोपताना ४ कप पाण्यात अर्धा चमचा सुंठ पावडर घालून ठेवा. सकाळी हे पाणी १ कप होईपर्यंत उकळा आणि गाळून घ्या. त्यामध्ये १ चमचा एरंडेल तेल घालून हा काढा घ्यायचा. यामुळे सूज कमी होण्यासोबतच अंगदुखी, शरीराचा कडकपणा कमी होण्यास मदत होते.
२. रेतीने शेक
आपण खेळण्यासाठी वापरत असलेली रेती तव्यावर गरम करा. एका कापडात बांधून त्याची पुरचुंडी करा आणि त्याने टाचा आणि त्याच्या आजुबाजूचा भाग शेका. झोपताना ५ ते १० मिनीटे अशाप्रकारचा शेक घेतल्यास आराम मिळण्यास मदत होईल.
३. आहाराबाबत अशी घ्या काळजी
दही, टोमॅटो, फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ शक्यतो खाऊ नयेत. रात्रीच्या वेळी हलका आहार घ्यावा आणि रात्रीचे जेवण लवकरात लवकर करायला हवे. यामुळे टाचदुखीसारखी समस्या कमी होण्यास मदत होते.