पाऊस सुरू व्हायचा अवकाश की दमट आणि ओलसर हवामानामुळे आरोग्याच्या समस्या लगेचच डोकं वर काढायला लागतात. कडक उन्हाने अंगाची लाहीलाही झालेली असताना पावसाचा शिडकावा छान वाटतो खरा. मात्र या पावसाने सांधेदुखी, अंगदुखी किंवा अॅसिडीटी यांसारख्या समस्यांना सुरुवात होते. शरीरात वाताचे प्रमाण वाढत असल्याने सांधे दुखण्याचे प्रमाण वाढते. एरवी आपली हाडे ठणकतात पण थोडा व्यायाम किंवा शरीराची हालचाल झाली की हे दुखणे थांबते. मात्र सांधेदुखीमध्ये शरीरातील हाडे, स्नायू, सांधे सगळेच दिर्घकाळ ठणकत राहते. वात दोष शरीरात पसरत असल्याने सांधेदुखीची समस्या उद्भवते. पावसाळ्यात आर्द्रतेमुळे सांधेदुखी सुरू होते (Home Remedies on Joint Pain Monsoon Special).
आधीपासून सांधेदुखीची समस्या असेल तर ही वेदना आणखी तीव्र होऊ शकते. पावसापूर्वी, बॅरोमेट्रिक दाब कमी होतो आणि यासोबत आपल्या शरीरावरील हवेचा दाबही कमी होतो, ज्यामुळे सांध्याभोवतीचे स्नायू आणि ऊतींचा विस्तार होतो, याचा दाब पडतो आणि सांधेदुखीला सुरुवात होते. एकदा सांधेदुखी सुरु झाली की आपल्याला काहीच सुधरत नाही. मग आपण एखादं तेल लावून हे दुखणं घालवण्याचा प्रयत्न करतो नाहीतर डॉक्टरांकडे जाऊन औषधं आणतो. मात्र यापेक्षा आपल्या रोजच्या जीवनशैलीत थोडे बदल केल्यास हा त्रास कमी होण्यास मदत होते. पाहूयात हे उपाय कोणते आणि ते कसे करायचे.
घरी सहज करता येतील असे सोपे उपाय काय?
१. तेलाने मसाज
पावसाळ्यातल्या कुंद वातावरणामुळे शरीर जडावतं, दुखतं. आळस येतो. या काळात शरीरातील ऊर्जा वाढवणं आणि टिकवणं महत्वाचं असतं. अंगाला खोबऱ्याच्या तेलानं मालिश केल्यास ऊर्जा निर्माण होते. मसाज केल्याने आखडलेले स्नायू लवचिक होतात. जडावलेल्या, दुखणाऱ्या शरीराला यामुळे आराम मिळतो. सांधेदुखी कमी होवून स्नायुंना ताकद मिळण्यास याची चांगली मदत होते.
२. वातूळ पदार्थ खाणे टाळावे
वात हे सांधेदुखीचे महत्त्वाचे कारण असते. त्यामुळे ज्यांना वाताचा त्रास आहे अशांनी पावसाळ्याच्या दिवसांत हवेत गारठा असल्याने शक्यतो गरम पदार्थ खावेत. इतकेच नाही तर पावसाळ्यात पाणीही गरम करुन प्यायला हवे, उकळल्यामुळे पाणी पचायला हलके होते. यामुळे वाताचा त्रास काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असते. तसेच या काळात बटाटा, रताळं, साबुदाणा, गवार, वांगी यांसारखे वातूळ पदार्थ आहारात शक्यतो टाळावेत. वात कमी झाल्यास सांधेदुखी कमी होण्यास मदत होते. याशिवाय आलं, लसूण, हळद, मेथी या गोष्टींचा समावेश करावा. आंबट आणि खारट पदार्थ शक्यतो टाळावेत.
३. शेक घेणे
गरम पाण्याने किंवा गरम पाण्याच्या पिशवीने अंगाला शेक देणे हा उत्तम उपाय ठरु शकतो. आयुर्वेदात अशा शेक घेण्याला बरेच महत्त्व आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने हा उपाय केल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. यामुळे आखडलेले स्नायू, अंग मोकळं व्हायला मदत होते.
४. व्यायाम
नियमितपणे हलका व्यायाम करणे अतिशय आवश्यक आहे. यामध्ये अगदी साधे स्ट्रेचिंगपासूनचे व्यायाम, सूर्यनमस्कार अशा किमान गोष्टींचा समावेश असायला हवा. रोजच्या व्यवहारात पायऱ्या चढ-उतार करणे, चालणे, सायकलचा वापर करणे अशा किमान गोष्टी आपण नक्कीच करु शकतो.