Join us   

हवा बदल झाल्याने सर्दी-कफाने बेजार? ४ सोपे घरगुती उपाय, मिळेल आराम, वाटेल फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2023 1:06 PM

Home Remedy For Cold And Cough : सर्दी-खोकल्यासाठी लगेच डॉक्टरांकडे न जाता घरच्या घरी उपाय करुन पाहा.

राज्यात सध्या थंडीचा कडाका कमी होत असून ऊन्हाचा तडाखा वाढत आहे. ऋतूबदल होताना हवामानात वेगाने बदल होत असल्याने त्याचा आपल्या शरीरावरही विपरीत परिणाम होतो. त्यामुळे या काळात सर्दी, खोकला, घसा पॅक होणे, ताप येणे, डोकेदुखी अशा समस्या घरोघरी उद्भवल्याचे दिसते. एकदा सर्दी-कफ झाला की आपल्याला काहीच सुधरत नाही. बरेचदा ही सर्दी नाक आणि छातीच्या मध्यभागी कफाच्या स्वरुपात अडकलेली असते आणि त्यामुळे आपल्याला जास्त अस्वस्थ वाटतं (Home Remedy For Cold And Cough). 

अशावेळी डोकं दुखणे, थकल्यासारखे वाटणे, सतत झोपून राहावेसे वाटणे असे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळेच होत राहते. घसा खवखवत असल्याने आणि कोरड पडत असल्याने सतत पाणी प्यावेसे वाटते. तसंच कफामुळे अन्नही फारसं जात नाही. अशावेळी डॉक्टरकडे जाऊन औषधे घेण्यापेक्षा घरच्या घरी काही उपायांनी हा सर्दी-खोकला बरा करता येतो.  औषधं घेऊन आपली प्रतिकारशक्ती कमी करण्यापेक्षा घरगुती उपाय करणे केव्हाही फायद्याचेच. त्यासाठी आजीबाईच्या बटव्यातील कोणते उपाय फायदेशीर ठरतात ते पाहूया..

१. चहाऐवजी काढा घ्या 

सर्दी किंवा कफ असेल की आपल्याला सारखं गरम काहीतरी घ्यावसं वाटतं. मग आपण सारखं चहा किंवा कॉफी घेतो. मात्र त्याऐवजी आयुर्वेदीक काढा घेतल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. आपल्या घरात तुळस, आलं, काळी मिरी, लवंग, दालचिनी, ज्येष्ठमध या गोष्टी असतातच. पाण्यात या सगळ्या गोष्टी चांगल्या उकळून त्यांचा काढा प्यायला हवा. हे पदार्थ उष्ण असल्याने सर्दी कमी होण्यास याची चांगली मदत होते. 

२. सुंठ गोळी 

गूळ, सुंठ पावडर आणि हळद या तिन्ही गोष्टी एकत्र करुन त्यांचे लहान लाडू करा आणि ते खा, यामुळे कफ बरा होण्यास मदत होईल. सकाळी आणि रात्री झोपताना ही गोळी खाल्ल्यास नक्कीच फरक जाणवेल. यातही तुमच्या घशाला सतत कोरड पडत असेल तर यात थोडे तूप घातले तरी चालेल. सुंठ पावडर नसेल तर किसलेल्या आल्याचाही उपयोग करु शकता. कोरड्या कफासाठी हा अतिशय चांगला उपाय आहे. 

३. गुळण्या करा 

मीठाच्या पाण्याने गुळण्या करणे हा सर्दी, खोकला आणि खवखवणाऱ्या घशासाठी अतिशय चांगला उपाय आहे. यामध्ये आपण थोडी हळद घातली तरी चालेल, कारण हळदीमुळे घशातील विषाणू मरण्यास मदत होईल. हे कोमट पाण्याने केल्यास चांगले, पण साध्या पाण्यानेही करु शकता. नाक आणि घशाच्या सगळ्याच भागाला यामुळे आराम मिळण्यास मदत होते. 

४. दूध - हळद

हळद ही अँटीबॅक्टेरीयल असल्याने त्यामुळे घशात संसर्ग झाला असेल तर तो निघून जाण्यास मदत होते. म्हणूनच सर्दी- कफ असेल तर रात्री झोपताना गरम दुधात हळद आणि थोडा गूळ घालून हे मिश्रण प्या. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सघरगुती उपाय