डोकं दुखायला लागलं की काहीच सूचत नाही. कामाच्या वेळेस डोकं दुखत (headache) असलं की काम करणं जमत नाही आणि आराम करायला मिळत नाही. अशा वेळेस पटकन पेन किलर घेण्याचा सोपा उपाय केला जातो. पण पेन किलर घेण्याचे धोके अनेक आहेत. त्यामुळे पेन किलरचा पर्याय टाळून आजीच्या बटव्यातले घरगुती उपाय करायला हवेत. डोकेदुखी काही मिनिटात कमी करणारे/ थांबवणारे असे 5 घरगुती उपाय (home remedy on headache) आहेत. आरोग्यास धोकादायक पेनकिलर घेण्याऐवजी घरगुती उपाय करणं केव्हाही चांगलंच!
Image: Google
डोकं दुखत असल्यास..
1. आल्याच्या औषधी गुणधर्मावर झालेला अभ्यास सांगतो की आल्याचं सेवन जेव्हा मर्यादित स्वरुपात, औषधाच्या मात्रे इतकं केलं जातं तेव्हा मायग्रेन समस्येतील डोकेदुखी देखील कमी होते. त्यामुळे डोके दुखत असल्यास आहारात आल्याचा समावेश करावा. यासाठी सोपा उपाय म्हणजे आल्याचा चहा करुन पिणं. आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात आल्याचं तेलही मिळतं. या तेलानं कपाळाला मालिश केल्यास डोकेदुखी कमी होते. मान, पाठ दुखत असल्यास त्यावरही हे आल्याचं तेल फायदेशीर ठरतं. खूप ताण आल्यामुळेही डोकं दुखतं. आल्यातील गुणधर्मांमुळे ताण कमी होतो. यासाठी आल्याचा चहा पिणं हा योग्य पर्याय आहे.
2. डोकं दुखायला सुरुवात झाली की लगेच काॅफी प्यावी. पण काॅफी पितांना मर्यादित प्रमाणात काॅफी प्यायला हवी. आणि काॅफी घेतल्यानंतरही थोड्या वेळानं पाणी प्यायला हवं. त्यामुळे शरीरातील ओलावा टिकून राहातो आणि काॅफी प्यायल्यानं डोकेदुखी कमी होते.
3. झोप कमी झाल्यास, झोप नीट न झाल्यासही डोकं दुखू शकतं. त्यामुळे डोकं दुखत असल्यास थोडा वेळ झोपावं. खूप वेळ कम्प्यूटर स्क्रीनसमोर बसून काम केल्यानं डोकं दुखत असल्यास डोकेदुखी कमी होण्यासाठी थोडा वेळ झोपावं, छोटीशी डुलकी काढावी. यामुळे डोक्याला आराम मिळतो. काॅफी प्यायल्यानंतर लगेच छोटी डुलकी काढल्यास चांगला फायदा होतो.
Image: Google
4. ताण तणावामुळे डोकं दुखतं. तणाव वाटत असल्यास तणावापासून मुक्त करणारे व्यायाम करावेत. योग, स्ट्रेचिंगचे प्रकार किंवा श्वासाचे व्यायाम केल्यास, थोडा वेळ ध्यानधारणा केल्यास डोकेदुखी कमी होते.
5. मायग्रेन सारख्या समस्येनं अचानक खूप डोकं दुखायला लागलं तर बर्फानं शेकणं हा देखील चांगला पर्याय आहे. 15 मिनिटं आइस बॅगनं डोकं शेकल्यास डोकेदुखीस आराम मिळतो. बर्फानं डोकं शेकल्यास रक्त वाहिन्या संकुचित होतात. यामुळे डोकंदुखी कमी
होण्यास मदत मिळते.