वर्क फ्रॉम होम असो किंवा ऑफिस असो दिवसभरात कामाच्या निमित्ताने आपला सतत स्क्रीनशी संपर्क येत असतो. ऑफिसमध्ये असताना दिवसातील बराच वेळ आपण मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, टॅबलेट यांसारख्या स्क्रीन बघण्यात घालवतो. वर्क फ्रॉम होमची पद्धत सुरु झाल्यापासून घरात देखील आपण या स्क्रीन बघण्यात सतत बिझी असतो. कॉम्प्युटर आणि मोबाईल यांचा अतिवापर तसेच इंटरनेटमुळे सोशल मिडियाचे लागलेले व्यसन हे डोळ्यांच्या तसेच इतरही शारीरिक, मानसिक आरोग्याला धोका निर्माण करत आहेत. इलेक्ट्रॉनीक्स वस्तूंच्या स्क्रीन वारंवार पाहत राहिल्यामुळे डोळ्यांची जळजळ, डोळ्यांना खाज येणे, डोळे कोरडे पडणे,अंधुकपणा, डोळ्यांतून पाणी येणे, धुरकट दिसणे यांसारख्या डोळ्यांच्या बाबतीत तक्रारी उद्भवतात. डोळ्यांच्या छोट्या - छोट्या समस्या दूर करण्यासाठी काकडीचा वापर करू शकतो.
कृती :-
१. हिरवीगार काकडी स्वच्छ धुवून घ्या. २. या काकडीला किसणीवर बारीक किसून घ्या. ३. किसून घेतलेल्या काकडीचा किस काही वेळासाठी किंवा थंड होईपर्यंत फ्रिजमध्ये ठेवून घ्यावा. (पर्यायी - नाही ठेवला तरी चालेल) ४. सतत स्क्रीनकडे पाहून आपल्या डोळ्यांची जळजळ होऊ लागल्यास हा काकडीचा किस आपल्या दोन्ही डोळ्यांवर पसरवून लावा. ५. सर्वप्रथम बेडवर झोपून मग डोळे बंद करून दोन्ही डोळ्यांवर हा किस अश्या पद्धतीने पसरून ठेवा की तुमचे डोळे संपूर्ण कव्हर होतील.
डोळ्यांच्या छोट्या - छोट्या समस्या दूर करण्यासाठी आपण काकडीचा वापर कसा करू शकतो याबद्दल समजून घेण्यासाठी satvicmovement या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलेला व्हिडीओ पाहूयात.
डोळ्यांवर काकडीचा किस लावल्याचे फायदे - १. डोळ्यांवर काकडीचा किस लावल्याने डोळ्यांना थंडावा मिळण्यास मदत मिळते. २. डोळ्यांना सूज आली असल्यास काकडीचा किस लावल्याने डोळ्यांवरची सूज उतरून आराम मिळतो. ३. काकडी एक नैसर्गिक क्लींजर आहे. त्यातील पाण्याच्या प्रमाणामुळे, आपण नैसर्गिक टॉनिक म्हणून काकडीच्या रसाचा वापर करू शकतो. ४. काकडीचे तुकडे एक चांगले मॉइश्चरायझर आहेत. डोळ्यांचा ओलावा वाढवण्यासाठी हे उपयुक्त ठरते.
डोळ्यांच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय – १. ठराविक वेळच मोबाईल, कॉम्प्युटर वापरावा. २. डोळ्यांची तक्रार जाणवल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ३. खेळणे, व्यायाम करणे अशा सवयी लावून घ्याव्यात. त्यामुळे रक्ताभिसरण चांगले होऊन डोळ्यांचे स्नायू स्वच्छ आणि मजबूत होतात. ४. मोबाईल, कॉम्प्युटर स्क्रीनमधून बाहेर पडणाऱ्या किरणांपासून संरक्षण होऊ शकेल असे चष्मे, लेन्सेस उपलब्ध आहेत त्यांचा वापर जरूर करावा. ५. अभ्यास किंवा स्वतःचं कामच कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर असेल तर अर्ध्या-अर्ध्या तासाचा ब्रेक घ्यावा. डोळे स्वच्छ धुवावेत.