डायबिटीस असे नुसते म्हटले तरी हल्ली अंगावर काटा येतो. चुकीच्या जीवनशैलीमुळे उद्भवणारी ही समस्या आजार नसल्याचे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. डायबिटीस हा जुना आणि दिर्घकाळ राहणारी समस्या असली तरी ती समस्या एका रात्रीत निर्माण होत नाही, तर दिर्घकाळ चुकीची जीवनशैली असलेल्यांना आणि आनुवंशिक कारणांनी ही समस्या उद्भवते. मागील दशकात लहान मुले, तरुण यांच्यामध्ये टाइप २ प्रकारचा डायबिटीस होण्याचे प्रमाण वाढले आहे. डायबिटीसमुळे व्यक्तीला भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी डायबिटीस होण्याआधीच तपासण्या केल्या आणि आपल्याला होण्याची शक्यता आहे हे समजले तर त्यावर वेळीच उपाययोजना करुन या समस्येपासून दूर राहता येणे शक्य आहे. महिलांमध्ये अनेकदा कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते, त्यामुळे आहार, व्यायाम, झोप यांचे संतुलन बिघडते आणि डायबिटीस होण्याचे प्रमाण वाढते.
प्री डायबिटीक म्हणजे काय ?
भविष्यात डायबिटीस होण्याची शक्यता असणे म्हणजेच प्री डायबिटीक, आपली जीवनशैली मागील बराच काळ चुकीची असेल किंवा आपल्या पालकांपैकी एकाला किंवा दोघांनाही डायबिटीस असेल तर आपल्याला डायबिटीस होण्याची दाट शक्यता असते. कार्बोहायड्रेटसचे आहारातील अतिरीक्त प्रमाण, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप आणि वाढता ताण ही डायबिटीस होण्याची काही महत्त्वाची कारणे सांगितली जातात. या कारणांमुळे शरीरात इन्शुलिन प्रतिरोधक स्थिती निर्माण होते. शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी हा घटक आवश्यक असतो. शरीरात जास्तीचे कार्बोहायड्रेटस ट्रायग्लिसराईडच्या स्वरुपात साचले जातात त्यामुळे शरीरातील इन्शुलिनच्या कामात अडथळा निर्माण होतो. मग इन्शुलिनला प्रतिकार न करणे, त्यानंतर प्री डायबिटीक आणि मग डायबिटीक अशाप्रकारे ही समस्या वाढत जाते.
प्री डायबिटीक असण्याची लक्षणे
१. तुम्ही प्री डायबिटीक असाल तर तुमची त्वचा काळवंडायला सुरुवात होते. यामध्ये मानेची, काखेतील त्वचा प्रामुख्याने काळवंडते.
२. कितीही प्रयत्न केला तरी वजन कमी होण्यात अडचणी येतात.
३. ओटीपोटाच्या भागातील चरबी वाढते आणि पोटाचा घेर कमी होत नाही.
४. थकल्यासारखे वाटते
५. सतत गोड खावेसे वाटते
६. सततची अंगदुखी किंवा डोकेदुखी
७. कार्बोहायड्रेटसयुक्त जेवण केल्यावर गुंगी किंवा पेंग आल्यासारखे होते.
८. महिलांना PCOS सारखे हार्मोन्सचे असंतुलन असलेल्या समस्या उद्भवतात.
तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही त्वरीत ड़ॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
चाचणी कशी करतात
यामध्ये प्रामुख्याने काही रक्तचाचण्या केल्या जातात
१. Hba1c
२. उपाशीपोटी रक्तातील साखरेची पातळी
३. जेवणानंतर २ तासांनी रक्तातील साखरेची पातळी
तुम्ही प्री डायबिटीक केव्हा असता?
१. Hba1c ५.७ ते ६.४ च्या मधे असल्यास
२. उपाशीपोटीची रक्तातील साखर १०० ते १२५ ml/dl असल्यास
३. जेवणानंतरची रक्तातील साखर १४० ते २०० ml/dl असल्यास
कोणते उपाय गरजेचे
१. आहारातील कार्बोहायड्रेटसचे प्रमाण कमी करुन प्रथिने आणि स्निग्ध पदार्थांचे प्रमाण वाढवावे. कार्बोहायड्रेटस इतक्या जास्त प्रमाणात शरीराला आवश्यक नसतात त्यामुळे आहारातील त्यांचे प्रमाण ३० टक्क्यांहून कमी असायला हवे
२. अधूनमधून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपवास करायचा प्रयत्न करा. ज्यामुळे शरीरात इंधन नसल्यामुळे शरीरात आधीपासून असणाऱ्या इंधनाचा वापर शरीर करेल आणि त्यामुळे चरबी घटण्यास मदत होईल. तसेच यामुळे शरीरातील इन्शुलिन प्रतिबंधक स्थिती काय आहे हे लक्षात यायला मदत होईल.
३. व्यायाम हा कोणत्याही समस्येवरील उत्तम उपाय ठरु शकतो. त्यामुळे तुम्ही प्री डायबिटीक असाल तर आठवड्यातून किमान ३ वेळा १० हजार पावले चालणे, ४५ मिनिटे अॅरोबिक व्यायाम आणि २० मिनिटे योगासने असा व्यायाम करायला हवा
४. शांत संगीत आणि ध्यान हाही ताण कमी होण्यासाठी उत्तम उपाय आहे.
५. चांगली झोप मिळणे उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे ६ ते ७ तासांची झोप मिळणे आवश्यक आहे.