सध्याच्या धकाधकीच्या जीवनात दररोज ताजे जेवण बनवायला वेळ मिळेलच असे नाही. त्यामुळे अनेक जण एक्स्ट्रा जेवण बनवून फ्रिजमध्ये साठवतात. फ्रिज हे एक असे मशीन बनले आहे, ज्याच्याशिवाय किचन अपूर्ण आहे. फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ अधिक काळ टिकतात. रात्री जेवण उरले की आपण अन्न डब्ब्यामध्ये साठवून फ्रिजमध्ये ठेवतो. कारण आपल्याला अन्न वाया गेलेले आवडत नाही. मात्र हे पदार्थ फ्रिजमध्ये ठेवून टिकवल्यामुळे ते खाण्यायोग्य राहते का? फ्रिजमध्ये ठेवलेले एखादा पदार्थ किती वेळ खाण्यायोग्य राहू शकते? असे अनेक प्रश्न आपल्या मनात उद्भवले असतीलच. हेल्थ एक्स्पर्टच्या अनुसार शिजवलेलं अन्न अधिक काळ फ्रिजमध्ये ठेऊ नये. ज्यामुळे अन्नावर बॅक्टेरिया वाढतात. जे आपल्या शरीरावरसाठी योग्य नाही.
यासंदर्भात सोशल मीडिया इंन्फ्लुएंसर क्रिश अशोक म्हणतात, "लोकांमध्ये हा गैरसमज आहे की फ्रिजमध्ये ठेवल्यास अन्नातील पोषक घटक नष्ट होतात. उलट, स्वयंपाक करताना अन्नातील अनेक पोषक तत्वे नष्ट होतात. जेवणातील पौष्टीक घटक रेफ्रिजरेशन नाही, खरं तर उष्णतामुळे नष्ट होतात. हवाबंद डब्यात शिजवलेले बहुतांश अन्न किमान दोन ते तीन दिवस टिकू शकतात, अथवा आठवड्यापर्यंत.''
काही पदार्थ लवकर खराब होतात
ते पुढे सांगतात, “काही भारतीय पदार्थ लवकर खराब होतात, त्यांना फ्रिजमध्ये साठवून ठेवा अथवा बाहेर ठेवा त्यांच्यावर जीवाणू साठू लागतात. उदारणार्थ शिजवलेल्या भातात अनेक जीवाणू साठू शकतात. त्यामुळे शिजवलेला भात त्याच दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी फस्त करावा. याशिवाय भारतीय खाद्यपदार्थांमध्ये मसाले, खारट आणि आंबट चवीचे पदार्थ फ्रिज-फ्रेंडली राहतात''.
अधिक काळ फ्रिजमध्ये साठवलेले अन्नाचे सेवन करू नये
तज्ज्ञांच्या मते, फ्रीजमध्ये ठेवलेल्या अन्नामध्ये तीन ते चार दिवसांनी बॅक्टेरिया वाढू लागतात. यानंतर, दीर्घकाळ ठेवलेल्या अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो. बॅक्टेरिया सहसा अन्नाची चव, वास किंवा रंग बदलत नाहीत. यामुळे, अन्न सुरक्षित आहे की नाही हे जाणून घेणे तुमच्यासाठी कठीण होऊ शकते.
बॅक्टेरिया वाढण्यापासून रोखण्यासाठी काय करावे
अन्नामध्ये बॅक्टेरिया वाढू नयेत म्हणून सर्वप्रथम दीर्घकाळ न टिकणाऱ्या गोष्टी खाव्यात. अधिक काळ टिकणारे अन्न हवाबंद डब्यात साठवून ठेवा. हे उरलेले अन्न रेफ्रिजरेटरच्या वरच्या रॅकमध्ये ठेवा जेणेकरून त्याला अधिक हवा आणि थंडपणा मिळेल. शिळे उरलेले फ्रीजच्या पुढच्या बाजूला आणि ताजे मागे ठेवा.