Join us   

आवडतं म्हणून खूप तूप खाता, नाहीतर अजिबातच खात नाही..तज्ज्ञ सांगतात असं करणं चूक की बरोबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2023 3:42 PM

How Much Ghee One Should Have Every Day : आहारतज्ज्ञ अमिता गद्रे तूपाबाबत सांगत असलेल्या टिप्स कोणत्या आणि त्या कशा फॉलो करायच्या याविषयी..

तूप हा अनेकांचा अतिशय आवडता पदार्थ. गरम भातावर, पोळीवर किंवा पराठ्यावर आपण आवर्जून तूप घालून खातो. इतकेच नाही आवडती भाजी नसेल तर तूप साखर, गूळ-तूप आपण आवडीने खातो. पुरणपोळी, गूळ पोळी तूपाशिवाय न खाल्ले जाणारे पदार्थ. तर खीर, हलवा यांसारखे पदार्थ तयार करण्यासाठीही आपल्याला तूप लागते. अनेकांना तर तूप इतकं आवडतं की ते कोणताही पदार्थ तूप घालून घाऊ शकतात. तूप आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने दिवसातून १ ते २ चमचे तूप आहारात अवश्य असायला हवे असे आहारतज्ज्ञ सांगतात. कारण पचनशक्ती सुधारण्यासाठी, त्वचा, केस चांगले होण्यासाठी तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी तूप अतिशय फायदेशीर असते. हाडांमधील वंगण म्हणूनही तूपाचा फायदा होतो. हे सगळे खरे असले तरी तूप कोणत्या प्रकारचे, किती प्रमाणात याबाबत आपल्याला योग्य ती माहिती असायला हवी (How Much Ghee One Should Have Every Day). 

मूळात तूप हे फॅटसचे बनलेले असते. त्यामध्ये कमी प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिंडंटसही असतात, ज्यामुळे प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होते. तसेच तूपात २५ टक्के ट्रायग्लिसराईडस असतात आणि इतर ७५ टक्के सॅच्युरेटेड फॅटस असतात. हे सगळे घटक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हे घटक शरीरात शोषले गेल्याने आपली ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. पण काही जण आवडतं म्हणून खूप जास्त प्रमाणात तूप खातात तर काही जण अजिबातच तूप खात नाहीत, हे दोन्हीही आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या शरीराला आवश्यक असणारे पोषण तूपातून होत असते पण त्यासाठी योग्य त्या प्रमाणातच तूप खायला हवे. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अमिता गद्रे तूप खाण्याविषयी काही महत्त्वाच्या टिप्स आपल्याशी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करतात. त्या टिप्स कोणत्या आणि त्या कशा फॉलो करायच्या पाहूया...

१. तरुणांनी आणि गर्भवती महिलांनी दररोज २ चमचे तूप खायला हवे. हे तूप गाईच्या दूधापासून किंवा म्हशीच्या दूधापासून केले असेल तरी चालते. तसेच हे ए १ आहे की ए २ आहे याचाही विशेष फरक पडत नाही कारण ते प्युअर फॅट असते आणि ए१ किंवा ए २ प्रोटीन नसते. 

२. आपण बराच काळ जास्त प्रमाणात तूप खातो तेव्हा त्यामध्ये असणाऱ्या सॅच्युरेटेड फॅटसमुळे आपल्या धमन्या जाड होण्यास कारणीभूत असतात. त्यामुळे मेटाबॉलिझम कमी होतो आणि शरीरावरील चरबी वाढते. 

३. काही लोक वजन कमी करण्यासाठी फॅट फर्स्ट  मेथड वापरतात. म्हणजेच सकाळी उठल्यावर २ चमचे तूप खाणे. मात्र यानंतर तुम्ही ब्रेकफास्टला कमी कॅलरीज आहारात घ्यायला हव्या. पण यामुळे वजन कमी होणे किंवा हार्मोन्सची पातळी चांगली राहणे असे फरक दिसून येतीलच असे नाही. 

४. सगळ्यात महत्त्वाचे काय तर तूपामध्ये सॅच्युरेटेड फॅटसचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे त्याचा आहारात समावेश करताना नेमके प्रमाण किती आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलआहार योजना