Join us   

नाकात बोट घालायची घाणेरडी सवय आहे? भविष्यात होईल गंभीर आजार, रिसर्चचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2023 5:00 PM

How Nose Picking is Bad Habit For Health It May Cause Alzheimer : या बॅक्टेरीयामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे वास घेण्याची शक्ती कमी होते. हेच अल्झायमर या आजाराचं प्राथमिक लक्षण आहे.

ठळक मुद्दे नाकाचे अस्तर खराब झाले तर मेंदूमध्ये बॅक्टेरिया जाण्याचा धोका वाढतो.सध्या ही चाचणी फक्त उंदरांवर झालेली असली तरी माणसांमध्ये याचे परीणाम आणखी गंभीर असण्याची शक्यता असू शकते

नाकात बोट घालणं ही वाईट सवय आहे हे आपल्याला माहित असते. मात्र तरीही अनेकदा आपण नाकात बोट घालून ते साफ करतो. काही वेळा नकळत आपला हात नाकात जातो. अनेकांना तर ही सवय इतकी जास्त प्रमाणात असते की आपण कुठे आहोत, आजुबाजूला कोण आहे याचे भानही या लोकांना राहत नाही आणि नकळत त्यांची बोटे नाकात जातात. लहान मुलं तर सर्रास नाकात बोटं घालतात. इतकंच नाही तर नाकातले केस वाढले तर ते काढण्यासाठी, नाकात एखादा फोड आला किंवा महिलांनी नाकात मोरनी किंवा नथ घातली असेल तर ती नीट करण्यासाठीही अनेकदा नाकात बोटं घातली जातात (How Nose Picking is Bad Habit For Health It May Cause Alzheimer). 

(Image : Google)

नाकात बोट घालणं हे स्वच्छतेच्या दृष्टीने तर चांगले नसतेच. अनेकदा आपल्याला समोरच्या व्यक्तीने नाकात बोटं घातली की किळसवाणे वाटते. पण आरोग्याच्या दृष्टीनेही नाकात बोटं घालणं घातक असतं असं नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे. नाकात बोट घालण्याच्या सवयीने अल्झायमर तसंच डिमेंशिया होण्याचा धोका असतो. ऑस्ट्रेलियामधील एका युनिवर्सिटीच्या शास्त्रज्ज्ञांनी नुकतेच यावर संशोधन केले असून त्यातून ही बाब समोर आली आहे. याठिकाणी उंदरांवर संशोधन करण्यात आलं. या अभ्यासात संशोधकांना असं आढळून आलं की, बोटांद्वारे क्लॅमायडिया न्यूमोनिए नावाचा बॅक्टेरिया नाकात जातो. हा बॅक्टेरीया थेट मेंदूपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यामुळे अल्झायमरसारखा गंभीर आजार उद्भवतो . 

(Image : Google)

सध्या ही चाचणी फक्त उंदरांवर झालेली असली तरी माणसांमध्ये याचे परीणाम आणखी गंभीर असण्याची शक्यता असू शकते असं हे संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांचे मत आहे. नाकात बोट घातल्याने नाकात असणारे एकप्रकारचे अस्तर खराब होण्याची शक्यता असते. हे अस्तर खराब झाले तर मेंदूमध्ये बॅक्टेरिया जाण्याचा धोका वाढतो. या बॅक्टेरीयामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे वास घेण्याची शक्ती कमी होते. हेच अल्झायमर या आजाराचं प्राथमिक लक्षण आहे. त्यामुळे तुम्हालाही नाकात बोटं घालायची सवय असेल तर आताच सावध व्हा नाहीतर भविष्यात अल्झायमरसारख्या गंभीर आजाराचा सामना करावा लागू शकतो. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स