Join us   

तुम्हीही मोड आलेले बटाटे खाता? असे करणे चांगले की वाईट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2022 4:27 PM

How Sprouted Potato's are harmful for Health : फेकून कुठे द्यायचे म्हणून हे बटाटे आपण मोड काढून वापरतोच. मात्र अशाप्रकारे मोड आलेले बटाटे वापरणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते का?

ठळक मुद्दे मोड आलेले विषारी बटाटे आपण खाल्ले तर उलट्या, जुलाब, पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात.बटाट्याला कोंब फुटल्यानंतर त्यामधील कार्बोहाड्रेट म्हणजेच स्टार्चचे साखरेमध्ये रूपांतर होते

बटाटे हा एखाद्या भाजीत भर घालण्यासाठी किंवा कधी घरात भाजी नसल्यावर ऐनवेळी करण्याची भाजी म्हणून वापरली जाणारी गोष्ट. मात्र घरात असणारा हा बटाटा आपल्याकडून वापरला जातोच असे नाही. अडीनडीला लागणारा हा बटाटा वापरला गेला नाही की तसाच पडून राहतो. प्रसंगी त्याला मोड येणे, हिरवे डाग पडणे किंवा तो मऊ होणे असे काही ना काही होते. अशावेळी फेकून कुठे द्यायचे म्हणून हे बटाटे आपण मोड काढून वापरतोच. मात्र अशाप्रकारे मोड आलेले बटाटे वापरणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते का? मोड आलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला कोणते त्रास होतात हे समजून घेणे गरजेचे आहे (How Sprouted Potato's are harmful for Health). 

(Image : Google)

कोंब आलेले बटाटे खाणं आरोग्यासाठी हानिकारक असते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कोंब येणे म्हणजे ती भाजी एका रासायनिक प्रक्रियेतून जात असल्याचे संकेत असतात. अशा रासायनिक प्रक्रिया झालेल्या भाजीचं सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. बटाट्याला कोंब फुटल्यानंतर त्यामधील कार्बोहाड्रेट म्हणजेच स्टार्चचे साखरेमध्ये रूपांतर होते, असे झाल्यामुळे बटाटा नरमही होतो. सोलानिन आणि अल्फा कॅकोनिन नावाच्या दोन अल्कलॉइडच्या निर्मितीमुळे बटाट्यामध्ये हे बदल होतात. हे दोन्ही घटक आरोग्यासाठी घातक असल्याने ते खाणे टाळावे, अशावेळी बटाटे फेकून देणे केव्हाही चांगले. 

(Image : Google)

याबरोबरच बटाट्याला हिरवे डाग पडले असतील तरी असे बटाटे खाऊ नयेत. किंवा ज्याठिकाणी हिरवे डाग आहेत तो भाग काढून टाकून इतर बटाटा खावा. असे मोड आलेले विषारी बटाटे आपण खाल्ले तर उलट्या, जुलाब, पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात. इतकेच नाही तर डोकेदुखी, ताप किंवा कमी रक्तदाब अशा समस्याही उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो एकावेळी आपल्याला लागतील तेवढेच बटाटे आणावेत. इतकेच नाही तर ते साठवताना कोरड्या आणि हवेशीर जागी साठवावेत. कांदे बटाटे एकत्र ठेवल्यासही बटाट्याला लवकर मोड येण्याची शक्यता असते. त्यामुळे कांदे आणि बटाटे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावेत.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स