सारखं कशाचं तरी टेन्शन (stress) मागे असलं की वेगवेगळे आजार मागे लागतात, हे आपण नेहमीच ऐकत असतो. याच आजारांपैकी एक आजार म्हणजे डायबिटीस (reasons for Diabetes). त्यामुळेच तर कोणताच ताण घेऊ नका, मनावरचा ताण कमी करा असा सल्ला ज्येष्ठ मंडळींकडून, डॉक्टरांकडून नेहमीच दिला जातो. आता अति ताण किंवा राग यांचा मधुमेहाशी काय संबंध, त्यामुळे शरीरात असा काय बदल होतो की ज्यामुळे असे वेगवेगळे आजार (How to control Diabetes) मागे लागतात, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडणं अगदी साहजिक आहे. त्याच प्रश्नाचं उत्तर पुणे येथील डॉ. उन्नीकृष्णन यांनी एका हिंदी वाहिनीशी बोलताना दिलं आहे.
त्यांच्या मते जेव्हा आपण कोणत्या तणावात असतो, तेव्हा आपल्या मस्तकात अशा काही क्रिया होतात की त्यामुळे गोड पदार्थांकडे आकर्षित होतो आणि अधिकाधिक गोड पदार्थ खाल्ले जातात. जेव्हा आपण काही गोड पदार्थ खातो तेव्हा जिभेवर असणारे टेस्ट बड्स उत्तेजित होतात. त्यामुळे डोपामाईन या न्युरोट्रान्समीटर्सचा स्तर वाढत जातो. आणि एखादी व्यक्ती अधिकाधिक गोड खाण्याकडे आकर्षित होते.
कोलेस्टेरॉल वाढण्याचं टेंशन विसरा, नाश्त्याला खा ३ पदार्थ- दिल-दिमाग तंदुरुस्त
तसेच जेव्हा एखादी व्यक्ती रागात असते किंवा खूप तणावात असते तेव्हा शरीरातील एड्रेनालाईन आणि काेर्टिसोल स्ट्रेस हार्मोन्स रिलीज करतात. या हार्मोन्समुळे हृदयाची गती, रक्तदाब आणि मेटाबॉलिझम या सगळ्याच क्रियांचा वेग वाढतो. त्यामुळे मग आपोआपच थकवा जाणवू लागतो. याच कारणामुळे ताण असला किंवा आपण रागात असलाे की जास्त भूक लागते, असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे. अशा अवस्थेत जर कार्बोहायड्रेट्स आणि गोड पदार्थ जास्त खाल्ले गेले तर रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते आणि डायबिटीस होण्याचा धोका वाढतो.
त्यामुळेच डॉ. उन्नीकृष्णन यांच्या मते जेव्हा तुम्ही रागात असता किंवा खूप तणावात असता, तेव्हा थोड्या वेळ रागातून किंवा तणावातून बाहेर या आणि तुम्ही नेमकं काय आणि किती खात आहात, हे एकदा तपासा. ज्यांच्या कुटुंबात मधुमेहाची अनुवंशिकता दिसून येते, त्यांनी तर या बाबतीत जरा अधिकच सावध राहण्याची गरज आहे. अशा व्यक्तींनी राग-राग, चिडचिड करणे टाळावे. तसेच योगसाधना, प्राणायाम यांचा अभ्यास करून मनावरचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा.