Join us   

मोड आलेली कच्ची कडधान्य खाल्ल्याने होतोय ब्लोटिंगचा त्रास ? बघा कडधान्य खाण्याची योग्य पद्धत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2023 7:38 PM

The Best Way of Eating Sprouts According to Ayurveda : कडधान्य खाणे हे आरोग्यासाठी चांगले असते असे नेहमीच सांगितले जाते. मात्र काही व्यक्तींना कडधान्य खाण्यामुळे गॅस आणि पोट फुगण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी काही सोप्या टिप्स.

कोणतेही अन्न व्यवस्थित शिजवूनच खाल्ले पाहिजे. कारण, कच्चे अन्न खाल्याने ते पचायला जड जाते. यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या उद्‍भवू शकतात. परंतु आहारात असे काही पदार्थ असतात जे कच्चेच खाल्याने शरीराला अधिक पोषकतत्व मिळतात. कोणत्याही कडधान्याला मोड येण्याची प्रक्रिया ही त्यातील पोषण मूल्य अनेक पटींनी वाढवते. त्यातही मोड आलेली कडधान्य कच्ची खाल्ली तर शरीराला आश्‍चर्यकारक फायदे होतात, असे आत्तापर्यंत आपण ऐकले असेल. कडधान्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात. परंतु ही मोड आलेली कडधान्ये कच्ची खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कितपत योग्य आहे ?  

आपल्याकडे बरेचदा सकाळच्या नाश्त्याला हेल्दी म्हणून मोड आलेली कडधान्य आवर्जून आवडीने खाल्ली जातात. कमी कॅलरीज आणि पौष्टिकतेसाठी बरेच लोक सकाळी कच्ची कडधान्य खाण्याला पसंती दर्शवतात. परंतु काहीवेळा कच्ची कडधान्य खाल्ल्याने त्याचा आपल्या शरीरावर खूप मोठा परिणाम होण्याची शक्यता असते. कडधान्यांमध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम आणि विटामिन्सचे अधिक प्रमाण असते. वेट लॉस करण्यासाठी उपाशीपोटी कडधान्य खाण्याचा सल्ला देण्यात येतो. काहीजणांना कडधान्य उपाशीपोटी खाल्ल्याने पोटात गॅस आणि ब्लोटिंग यांसारख्या समस्या निर्माण होतात. कडधान्य खाल्ल्याने पोट पटकन भरते आणि लवकर भूक लागत नाही. कच्ची कडधान्य खाल्ल्याने पोटात गॅस होणे, अपचन होणे, ऍसिडिटीचा त्रास अशा अनेक समस्या होऊ शकतात. त्यामुळे कडधान्य खाताना ती नेमकी कच्चीच खावी की शिजवून खावी, तसेच मोड आलेली कडधान्य किती दिवसांनी खावी या सगळ्या विषयांबाबत आयुर्वेदिक डॉ. नितिका कोहलीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेली माहिती नेमकी काय आहे ते पाहूयात(How to avoid gas and bloating after eating sprouts).

१. कडधान्य खाल्ल्यामुळे गॅस होतो का ? 

रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी कडधान्य खाल्ल्याने गॅस, अपचन आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. रात्रीच्या वेळी कडधान्य खाणे अपायकारक ठरू शकते. नेहमी रात्रीच्या वेळी हलका आहार घ्यावा. रात्री जड जेवण खाल्ल्याने पोटावर परिणाम होतो. कडधान्य खाल्ल्यानंतर पचायला अधिक वेळ लागतो. आयुर्वेदात कडधान्य खाण्याला जास्त महत्व दिले जाते. परंतु कडधान्यांमध्ये हिटिंग घटक अधिक असतात ज्यामुळे गॅस आणि पोट फुगण्याची समस्या निर्माण होऊ शकते. अनेकदा काहीजणांना कडधान्य खाल्ल्यानंतर पोट गच्च भरल्यासारखे वाटत राहाते. त्यामुळे ज्यांना गॅस, बद्धकोष्ठता आणि ब्लोटिंगची समस्या आहे त्यांनी उपाशीपोटी कडधान्य खाणे चुकीचे ठरते.

२. कडधान्य खाण्याची योग्य पद्धत... 

कडधान्याला मोड आल्यानंतर २ ते ३ दिवसांनी खावे असे म्हटले जाते. मात्र हे चुकीचे आहे. कडधान्याला मोड आल्यानंतर साधारण दुसऱ्या दिवशी हे खावे. तसंच ज्यांना गॅस आणि ब्लोटिंगचा त्रास आहे त्यांनी कडधान्य नेहमी उकडूनच खावे असेही डॉ. नितिका कोहली यांनी सांगितले आहे. 

रोज किती चमचे साखर खाणं योग्य? साखर खाणं पूर्णच बंद करुन टाकलं तर तब्येत सुधारते, तज्ज्ञ सांगतात...

कोण म्हणतं वजन कमीच होत नाही? ४ साधे-सोपे उपाय-वजन कमी होणारच....

३. कडधान्य शिजवून खाणे ठरेल फायदेशीर... 

कडधान्यातील सर्व पोषक तत्व हे शरीरासाठी फायदेशीर असून नेहमी याची उसळ करून किंवा शिजवूनच खावे असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे. उकडलेले किंवा शिजवलेले कडधान्य पचवणे अधिक सोपे असते. शिजवलेली कडधान्ये कच्च्या कडधान्याच्या तुलनेत पचणे सोपे असते. त्यामुळे कडधान्य खाल्ल्यानंतर जर आपल्याला पोट फुगण्याची समस्या उद्भवत असेल तर कडधान्य शिजवून खाणे आरोग्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरेल. 

४. कच्ची कडधान्ये खाणे टाळावे... 

जर आपली पचनशक्ती कमी असेल आणि जर आपल्याला सतत वेगळं खाल्ल्याने पोटात त्रास होत असेल, तसेच गॅस आणि ब्लोटिंगची समस्या असेल तर कच्ची कडधान्य खाणे टाळावे. अशा परिस्थितीत जर आपण कच्ची कडधान्य खाल्ली तर आपल्याला खूप त्रास होऊ शकतो. तसेच या समस्या नसतील तर आपण कच्ची कडधान्य खाऊ शकता.

वजन कमी करण्याचा ५० - ३५ - १५ फॉर्म्युला, ऋजुता दिवेकर सांगतात लठ्ठपणा कमी करण्याची खास ट्रिक...

५. कच्ची मोड आलेली कडधान्य खाण्याचे दुष्परिणाम... 

१. कच्ची मोड आलेली कडधान्य खाल्ल्याने पोटात गॅस होऊ शकतो.  २. अपचन होण्याची शक्यता असते.  ३. जर आपल्याला पित्त किंवा अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असेल तर मोड आलेली कच्ची कडधान्य खाणे टाळावे.  ४. लहान मुलं, गर्भवती महिला, वयोवृद्ध यांनी कडधान्य शिजवूनच खावीत, कच्ची खाऊ नयेत.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य