Join us   

तरुण वयात हार्ट ॲटॅक येण्याची भीती वाटते? आहारात कायम हवे ५ घटक, हृदयाची धडधड राहील सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2023 1:07 PM

How To Avoid Risk of Heart Attack : हृदयरोग बळावू नये यासाठी आपली जीवनशैली चांगली असणे गरजेचे असते.

हार्ट ॲटॅक ही अशी गोष्ट आहे की काही क्षणात आपलं आयुष्य होत्याचं नव्हतं होतं. आपल्याला काही कळायच्या आत हृदयाशी संबंधित त्रास सुरू होतो आणि आयुष्य संपतं. पूर्वी हार्ट ॲटॅक येण्याचे वय हे साधारण ६० च्या पुढे होते पण आता ते वय ४० पर्यंत आले आहे. त्यामुळे कमी वयात हृदय कमकुवत होणे ही आरोग्याच्यादृष्टीने नक्कीच चिंताजनक बाब आहे. आपल्या जीवनशैलीत झालेले बदल हे यामागील सर्वात मोठे कारण असून वेळीच योग्य ती काळजी घेतल्यास आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. हृदयरोग बळावू नये यासाठी आपली जीवनशैली चांगली असणे गरजेचे असते. यासाठी आहार, झोप, व्यायाम या किमान गोष्टींकडे आपण वेळीच लक्ष द्यायला हवे. हृदयाचे कार्य सुरळीत राहण्यासाठी आहारात घ्यायलाच हवेत असे ५ घटक कोणते ते पाहूया (How To Avoid Risk of Heart Attack)...

(Image : Google)

हार्ट अटॅक म्हणजे काय? 

हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये काही कारणाने ब्लॉकेजेस झाले तर हा रक्तपुरवठा अनियमित होतो. त्यामुळे हृदयाच्या कामात अडथळा निर्माण होतो. ही समस्या साधारणपणे लक्षात येत नसल्याने वयाच्या तिशीनंतर दर एक ते दोन वर्षांनी मेडिकल चेकअप करणे आवश्यक आहे. या माध्यमातून आपल्याला काही त्रास असल्यास तो वेळीच लक्षात येतो आणि उपचार करणे सोपे होते. रक्ताच्या माध्यमातून हृदयाला पुरेसा ऑक्सिजन पुरवठा झाला नाही तर ही समस्या उद्भवते. त्यामुळे लठ्ठपणा, बीपी, मधुमेह यांसारख्या आरोग्याच्या समस्या असतील तर वेळच्यावेळी तपासण्या आणि औषधोपचार करणे गरजेचे आहे. हार्ट ॲटॅक अत्यंत तीव्र किंवा मध्यम स्वरूपाचा असतो, पहिल्या तासात रुग्णाची परिस्थिती अत्यंत नाजूक आणि गंभीर असते. यावेळेत योग्य उपचार मिळाले तर रुग्णांचा जीव वाचू शकतो.  

आहारात जरुर घ्यायला हवेत असे ५ घटक

१. पालक आणि ब्रोकोली - खरंतर सगळ्यात हिरव्या पालेभाज्या हृदयासाठी आवश्यक आहेत. पण त्यातल्या त्यात पालक अधिक पोषक मानला जातो. पालकामध्ये मोठ्या प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स, खनिजे, व्हिटॅमिन के असते. हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने तुमचा हृदयविकाराचा धोका १६ टक्क्यांनी कमी होतो. तर ब्रोकोली हा plant-based protein चा खूप चांगला स्त्रोत मानला जातो. हृदयासाठी पोटॅशियम, फोलेट गरजेचं आहे. १ कप उकडलेल्या ब्रोकोलीतून जवळपास ५५० मिलीग्रॅम पोटॅशियम आणि १४ टक्के फोलेट मिळतं.

२. नटस -  अक्रोड आणि बदामासारखे नट हे अनेक पोषक तत्वांचा उत्तम स्रोत आहेत. त्यामुळे हृदय निरोगी राहते. नियमितपणे अक्रोडाचे सेवन केल्याने बंद झालेल्या धमन्या उघडण्यास आणि त्या निरोगी राहण्यास मदत होते.  नियमितपणे ३ ते ४ अक्रोड खावेत. फायबर आणि मॅग्नेशियम, कॉपर, मँगनिज असे हृदयासाठी पोषक असणारे मायक्रोन्युट्रीयंट्स त्यात भरपूर प्रमाणात असतात.

(Image : Google)

३. बीट - बीटरूटमध्ये नायट्रेट चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे ते फुफ्फुस आणि हृदयासाठी अतिशय चांगले मानले जाते. तसेच रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठीही बीट फायदेशीर असते. बीटाच्या रसात फ्लेवोनोइ़डस आणि फाइटोन्यूट्रीअंटस असतात यामुळे बॅड कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहते .

४. जवस - बॅड कोलेस्टेरॉल म्हणजे हानिकारक फॅट्स कमी होतात .रक्तदाब नियंत्रणात राहण्यास याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे जवसाची चटणी, भाजलेले जवस बडीशोपमध्ये मिक्स करु, जवसाचे लाडू असे पदार्थ आपण रोजच्या आहारात आवर्जून घेऊ शकतो. 

५. डाळींबं - डाळींब हेही आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असे फळ आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंटस , व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, पोटॅशिअम, फोलिक ॲसिड, लोह असे घटक असतात. यामुळे हृदयरोगासारख्या तक्रारी दूर होण्यास मदत होते. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहृदयविकाराचा झटकाहृदयरोग