उन्हाळ्याच्या दिवसांत हवामानातील तापमान इतके वाढलेले असते की त्याच्याशी जुळवून घेताना आपले शरीरही काही ना काही लक्षणं दाखवते. उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेमुळे फोड येणे, चक्कर येणे यांसारख्या समस्या उद्भवतात त्याचप्रमाणे उन्हाळ्याच्या काळात लघवीशी निगडीत समस्याही उद्भवतात. या काळात लघवीचे प्रमाण कमी होते कारण शरीराला पाण्याची जास्त आवश्यकता असते. याशिवाय अनेकांना उन्हाळ्याच्या दिवसांत पिवळ्या रंगाची लघवी होते, कोणाला लघवी करताना जळजळ होते. या गोष्टीकडे अनेकदा आपण फार गांभीर्याने लक्षही देत नाही. मात्र या समस्यांकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक असते (How To Avoid Urine Infection Diet Tips).
यामध्ये घाबरण्यासारखे काही नसले तरी त्याकडे दुर्लक्ष करणेही योग्य नाही. उन्हाळ्यात घाम अधिक येतो आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे या दिवसात लघवीत क्षारांचे प्रमाण वाढते. उन्हाळ्याच्या दिवसांत जास्त काम, व्यायाम केल्यामुळे आणि पाणी कमी प्यायल्यामुळे शरीरातील पाणी घामावाटे बाहेर पडते आणि लघवी पिवळी होण्याचा त्रास होतो. त्यामुळे उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी पिणे हा सर्वोत्तम उपाय आहे. याशिवाय नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फर्मेशननुसार आहारात ४ पदार्थांचा समावेश केल्यास लघवीची समस्या आटोक्यात येण्यास मदत होते. हे पदार्थ कोणते ते पाहूया...
१. प्रिबायोटीक फूड
लघवी व्यवस्थित होण्यासाठी आहारात प्रिबायोटीक फूडचा योग्य प्रमाणात समावेश असणे आवश्यक असते. यासाठी आहारात दही, ताक, लोणचे यांसारख्या आंबट पदार्थांचा तसेच कोबीच्या भाजीचा समावेश करायला हवा. या पदार्थांमध्ये चांगले बॅक्टेरीया असतात जे संसर्गाशी लढण्यासाठी उपयुक्त असतात.
२. फायबर
केळी, डाळींब यांसारखी फळे, सॅलेड, ओटस, डाळी, दाणे, बिया यांसारख्या पदार्थांमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. फायबरचा आहारात समावेश वाढवल्यास शरीरातील अनावश्यक बॅक्टेरीया दूर होण्यास मदत होते. तसेच फायबरमुळे शरीरातील घाण बाहेर टाकण्यास मदत होते.
३. हिरव्या पालेभाज्या
पालक, ब्रोकोली किंवा अन्य पालेभाज्या युरीनशी निगडीत समस्यांसाठी अतिशय फायदेशीर असतात. शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आवश्यक असणारी पोषक मूल्ये या भाज्यांमध्ये असल्याने त्या शरीराच्या विविध कार्यासाठी मदत करतात. इन्फेक्शन दूर करण्यासाठी आवश्यक असलेली प्रतिकारशक्ती या भाज्यांमधून मिळते.
४. पाणी आणि द्रव पदार्थ
लघवी साफ होण्यासाठी आणि शरीर स्वच्छ-शुद्ध राहण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणे आवश्यक असते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास लघवी साफ होते आणि तिचा रंगही पिवळा न दिसता पारदर्शक दिसतो. पाण्याबरोबरच सरबते, नारळ पाणी, ताक, सोलकढी असे द्रव पदार्थ उन्हाळ्यात आहारात आवर्जून घ्यायला हवेत.