निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक आहार जितका महत्वाचा तितकाच तो व्यवस्थित पचणंही गरजेचं. पचनाची क्रिया योग्य असेल तरच अन्नातील पाचक रस शरीरातील प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचतात. पचनक्रिया योग्य नसल्यास आहार पौष्टिक असला तरी पचनाच्या विविध समस्या निर्माण होवून आरोग्य बिघडतं. पचन व्यवस्थित नसेल तर त्याची लक्षणंही जाणवतत. पचन कमजोर असेल तर जेवल्यानंतर थकवा येतो, झोप येते. पोट फुगतं, पोटात गॅसेस होतात, पोट जड राहातं. या समस्या टाळण्यासाठी पचन सुधारणं गरजेचं. पचन सुधारण्यासाठी डाॅ. राजकुमार यांनी काही सोपे उपाय सांगितले आहे, जे आपण सहज अमलात आणू शकतो.
Image: Google
पचन सुधारण्यासाठी..
1. दिवसभरात योग्य प्रमाणात, पुरेसं पाणी प्यावं. पाणी कमी प्याल्यास पचनक्रिया सुरळीत काम करत नाही. पुरेसं पाणी प्यायलं तर पचनक्रिया सुदृढ राहाते. सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात निंबू पिळून ते पाणी प्यावं. यामुळे पोटातील ॲसिड कमी होवून पोट स्वच्छ होतं. पचनक्रिया बिघडलेली असल्यास दोन्ही वेळेसच्या जेवणानंतर गरम पाणी प्यावं.
2. आपली दिनचर्या सुरळीत आणि आरोग्यदायी असणं आवश्यक आहे. वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं, वेळेवर जेवणं या गोष्टी पचनासाठी महत्त्वाच्या असतात. पचनाशी निगडित समस्या आरोग्यदायी दिनचर्या पाळून दूर करता येतात. आरोग्यदायी दिनचर्येत पचनक्रिया व्यवस्थित राहाण्यासाठी रात्री लवकर झोपणं महत्वाचं असतं. उशिरापर्यंत जागण्याचा पचनावर वाईट परिणाम होतो. पचनक्रिया सुदृढ राहाण्यासाठी रात्री लवकर झोपणं आणि 7-8 तास चांगली झोप घेणं आवश्यक आहे.
3. शरीर आणि मनावरच्या अतिरिक्त ताणानं पचनाच्या समस्या निर्माण होतात. तणावाचा पचनावरही परिणाम होतो. पचन सुधारण्यासाठी जीवनशैली तणावरहित असणं आवश्यक आहे.
4. ज्या व्यक्ती दिवसभरात पुरेसे शारीरिक कष्ट करत नाही त्यांचं पचन बिघडलेलं असतं. शरीराच्या पुरेशा हालचाली होणं गरजेच्या. त्यासाठी रोज व्यायाम करणं, चालणं या क्रिया आवश्यक असतात.
Image: Google
5. नाश्ता असू देत नाहीतर जेवण प्रमाणात खायला हवं. जास्त खाल्ल्यानं पचन बिघडतं. जेवढी भूक आहे तेवढंच खावं. चव चांगली लागली, आवडता पदार्थ आहे म्हणून प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यास पचन बिघडतं.
6. वय वाढत जातं तसे तेलकट पदार्थ पचवण्याची क्षमता कमी होत जाते. रोज तेलकट पदार्थ खाल्ल्यास उलट्या होणं, अपचन होणं, करपट ढेकरा येणं या पचनाशी निगडित समस्या निर्माण होतात. तेलकट पदार्थांप्रमाणेच जास्त फॅट्स असलेले पदार्थही खाऊ नये. जास्त फॅट्स असलेल्या पदार्थांनी पचनक्रिया मंदावते.
7. रोजच्या आहारात तंतूमय पदार्थांचा ( फायबरयुक्त) समावेश असावा. पदार्थातील फायवरमुळे पचन सुलभ होतं. पचनास मदत करणारे विकर वाढावेत यासाठी सकाळच्या आहारात दह्याचा समावेश करावा. क जीवनसत्वयुक्त भाज्या आणि फळांचा समावेश करावा. रोजच्या आहारात आवळा असावा. आवळ्यामुळे शरीरातील क जीवसत्वाची कमतरता भरुन निघते. जेवणात कच्चं सॅलेड खावं. यामुळे पोटात पचनास सहाय्यक फायबर पुरेशा प्रमाणात जातं.
8. पचनशक्ती सुधारण्यासाठी रोज एक केळ खावं. तसेच पिकलेल्या पपईसोबतच कच्च्या पपईचाही आहारात समावेश असावा.
9. पचनासंबंधीचे विकार दूर करण्यासाठी कोरफड सहाय्यक ठरते. यासाठी पाण्यात कोरफड जेल टाकून प्यावं. कोरफडमुळे पोटील आतड्यांना आलेली सूजही कमी होते.
10. अपचन, अल्सर, पित्त या आजारांवर दाह आणि सूजरोधी असलेली हळद उपयोगी ठरते. यासाठी एक ग्लास पाण्यात थोडी हळद टाकून ते पाणी रोज प्यावं.