Join us   

हवा बदलली की लगेच गॅसेस, अपचनाचा त्रास? ३ सोपे व्यायाम-वाटेल रिलॅक्स, पोटाला मिळेल आराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2024 9:43 AM

how to boost your gut health easy Home remedies : लगेच डॉक्टरांकडे जाणे किंवा औषधे घेण्यापेक्षा काही सोपे उपाय केल्यास फायदा होतो

नुकतीच हिवाळ्याची चाहूल लागत असली तरी अजून पाऊस पूर्ण थांबलेला नाही. शिवाय  दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे चकली, शेव, लाडू असे बेसनाचे, तळलेले पदार्थ खाणे होणार हे ओघानेच आले. तसेच एकमेकांकडे गेल्यावर गोडधोड आणि इतरही काही ना काही खाणे होते. खाण्याच्या बदलणाऱ्या वेळा, वातावरणात होणारे बदल आणि क्षीण झालेली पचनशक्ती याचा पचनक्रियेवर ताण येतो (how to boost your gut health easy Home remedies). 

यामुळे पोटात गुबारा धरणे, गॅसेस होणे, अपचन किंवा अॅसिडीटीसारख्या समस्या उद्भवणे असे त्रास होतात. कधी करपट ढेकर येतात तर कधी खायलाच नकोसे वाटते. तुम्हीही अशा त्रासांमुळे हैराण असाल तर काही सोपे उपाय करणे गरजेचे असते. लगेच डॉक्टरांकडे जाणे किंवा औषधे घेण्यापेक्षा काही सोपे व्यायामप्रकार केल्यास आणि जीवनशैलीत काही बदल केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. 

१. पश्चिमोत्तानासन – या आसन प्रकारात पाय सरळ लांब करून बसावे. पाय गुडघ्यात न वाकवता हाताच्या बोटांनी पायाचे अंगठे पकडण्याचा प्रयत्न करावा. सुरूवातीला अंगठे पकडणे शक्य होईलच असे नाही. अशावेळी हात पायच्या घोट्यापर्यंत किंवा पोटर्‍यांपर्यंत पोहचला तर तिथे पकडावे. मान शक्य तेवढी खाली नेत कपाळ गुढघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करावा. सरावाने हे आसन योग्यप्रकारे जमू शकते.

(Image : Google)

२. बालासन – या आसन प्रकारात तुमच्या पोटावर दाब आल्याने पोटातील अतिरिक्त गॅस बाहेर पडतो आणि पचनक्रिया सुरळीत होते. यासाठी दोन्ही पाय मुडपून वज्रासनात बसावे. नंतर दोन्ही हात वर न्यावे. समोर वाकत दोन्ही हात, कपाळ जमीनेला टेकवावे. यात हात वर नेताना दीर्घ श्वास घ्यावा व श्वास सोडत हळूहळू पुढे वाकवे. 

३. मार्जारीआसन – मांजर ज्याप्रमाणे आळस देते त्यापद्धतीने हे आसन आहे. यात लहान बाळ रांगताना जशा स्थितीत असते तसे दोन्ही गुढघे आणि हातचे पंजे टेकवावे. यात मान, पोट आणि पाठीचा उत्तम व्यायाम होतो. श्वास घेत मान मागे, पाठ खोल करत जावी तर श्वास सोडत हळुवारपणे मान खाली हनुवटी छातीला टेकवण्याचा प्रयत्न करावा व त्यावेळी पाठीची कमान करत पोट आत खेचावे. 

जीवनशैलीत कोणते बदल करता येतील..

१. आंबवलेले पदार्थ – आहारात इडली, उतप्पा यासारखे आंबवलेले पदार्थ आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा. यामुळे पचन सुधारते. 

(Image : Google)

२.झोप – रोज रात्री किमान ७ तास पूर्ण शांत झोप घ्यावी. शिवाय झोपताना डाव्या कुशीवर झोपावे. यामुळे पचन नीट होते व पित्त वर येत नाही. 

३. तणाव नियंत्रण – चिंता, ताण यामुळे पचनशक्ती खराब होते. त्यामुळे तणाव नियंत्रण करणे फार आवश्यक असते. यासाठी प्राणायाम, ध्यान, संगीत ऐकणे हे फार उत्तम पर्याय ठरतात.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल