पूर्वीच्या काळी रात्री झोपताना रजई, गोधडी किंवा अगदी चटईचा वापर केला जायचा. मात्र आपली जीवनशैली जशी बदलत गेली तशा आपल्या सगळ्याच गोष्टींमध्ये फरक पडत गेला. गेल्या काही वर्षात गादी हीच झोपेसाठी सर्वोत्तम मानली जाऊ लागली. यातही असंख्य प्रकार बाजारात उपलब्ध असून सुती कापसाची गादी, नायलॉनच्या कापसाची गादी, काथ्याची गादी, कापडाची कडक गादी असे बरेच प्रकार गाद्यांमध्ये पाहायला मिळू लागले. गादी ही मऊ आणि उबदार असल्याने झोपण्यासाठी गादीचा वापर गेल्या काही वर्षात वेगाने वाढला. प्रत्यक्षात आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर जमिनीवर झोपणे सर्वात उत्तम. मात्र आता ते कमीपणाचे समजले जात असल्याने गादी आणि बेडशिवाय कोणीच झोपत नाही (How To Choose Perfect Mattress).
आता आपण वापरतो ती गादी चांगली आहे की नाही, गादीचा चांगलेपणा कसा ओळखायचा असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला पडतात. गादीवर झोपूनही अनेकदा आपली पाठ दुखते, ते कशामुळे असे होऊ नये आणि आपली झोप गाढ, शांत व्हावी यासाठी गादीची निवड करताना काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात. गादीच्या क्वालिटीवर आपली झोपेची क्वालिटी अवलंबून असते. आणि झोपेच्या क्वालिटीवर आपली आरोग्याच्या क्वालिटी अवलंबून असते. आपल्या आय़ुष्यातील ३३ टक्के काळ आपण गादीवर व्यतीत करतो. त्यामुळे आपण झोपण्यासाठी वापरत असलेली गादी कायम आरोग्यासाठी, झोपेसाठी उत्तम असायला हवी. सात्विक मूव्हमेंट या अंतर्गत गादीच्या निवडीबाबत काही महत्त्वाच्या टिप्स शेअर करण्यात आल्या असून त्या नेमक्या काय आहेत हे समजून घेऊया. कडक स्वरुपाची गादी आपल्या आरोग्यासाठी जास्त चांगली असते. असे का यामागची कारणे समजून घेऊया...
१. कडक गादीमुळे आपला मणका सरळच्या सरळ राहतो. मणका सरळ असेल तर आपली फुफ्फुसेही एका विशिष्ट पोश्चरमध्ये राहतात. ज्यामुळे श्वासोच्छवास क्रिया करणे सोपे जाते. हेच गादी मऊ असेल तर आपले शरीर एका सरळ रेषेत नसते, ज्यामुळे फुफ्फुसांना श्वसनक्रियेसाठी जास्तीचे कष्ट घ्यावे लागतात.
२. गादी जास्त मऊ असेल तर आपल्या शरीराचा भार असमान पद्धतीने विभागला जातो. यामध्ये पोटाच्या किंवा कंबरेच्या भागावर जास्त वजन पडते आणि इतर शरीरावर कमी भार पडतो. पण हेच आपण कडक गादीवर झोपलो तर शरीराचा भार समान पद्धतीने विभागला जातो. यामुळे सर्व्हायकल पेन, मानदुखी आणि इतर सांधेदुखी उद्भवण्याची शक्यता असते.
३. तुमची गादी खूप मऊ असेल तर शरीराचा सर्व ताण हा स्नायूंवर येतो. पण त्याजागी कडक गादी असेल तर स्नायूंना पुरेसा सपोर्ट मिळतो आणि संपूर्ण रात्रभर आपण रिलॅक्स राहू शकतो. त्यामुळे आपल्याला शांत आणि गाढ झोप लागण्यास मदत होते. त्यामुळे गादीची निवड करताना ती खूप मऊ नसावी.