Join us   

How To Clean Ear : कानात खूप मळ झालाय? ४ सोपे उपाय, कान सांभाळा- चुकीचे प्रयोग टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2022 4:07 PM

How To Clean Ear : आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर शरीराची स्वच्छता महत्त्वाचीच, पण चुकीच्या पद्धती अवलंबल्या तर अवयवांना इजा पोहचू शकते.

ठळक मुद्दे कानाचा पडदा नाजूक असल्याने त्याला इजा झाल्यास हे दुखणे वाढू शकते. त्यामुळे कोणतीही टोकदार गोष्ट कानात घालून कोरु नये. कानातला मळ वेळेत निघाला नाही तर ऐकू कमी येणे, इन्फेक्शन होणे अशा समस्या उद्भवू शकतात

आपण दररोज दात घासतो, आंघोळ करतो, केस धुतो, नखे कापतो त्याचप्रमाणे स्वच्छतेच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाची गोष्ट करायला हवी ती म्हणजे कान साफ करण्याची. शरीर अनावश्यक घटक ज्याप्रमाणे घाम, लघवी यांच्याद्वारे बाहेर टाकते. त्याचप्रमाणे कानात आलेला मळ हे शरीराला अनावश्यक असणारे घटक असतात हे लक्षात घ्यायला हवे. अनेकदा आपण एखाद्याच्या शेजारी उभे असू आणि त्याच्या कानाकडे आपले चुकून लक्ष गेले तर मळाने भरलेला कान पाहून आपल्याला कसेतरीच होते. इतकेच नाही तर कानात मळ साठला तर ऐकू कमी येणे, इन्फेक्शन होणे अशा अनेक तक्रारीही निर्माण होतात. (How To Clean Ear) त्यामुळे कानातला मळ वेळच्या वेळी साफ करणे आवश्यक असते. 

(Image : Google)

काहींचा मळ ओलसर असतो तर काहींचा वाळून कोरडा झालेला असतो. कानात जास्त मळ असेल तर आपल्यालाही कान जड झाल्यासारखे होते, अस्वस्थ होते. काहीवेळा कानात खाज येणे, कान दुखणे हेही मळ साठल्याने होऊ शकते. मळ नियमितपणे काढला गेला नाही तर त्याचे दगड होतात आणि डॉक्टरांकडे जाऊन हा मळ काढून घ्यावा लागतो. इतकेच नाही या कानातील मळाचे प्रमाण जास्त झाले तर काही वेळा लहानशी शस्त्रक्रिया करुन हा मळ काढून टाकावा लागतो. असे होऊ नये म्हणून आपण ज्याप्रमाणे आठवड्यातून एकदा नखे कापतो, केस धुतो त्याचप्रमाणे नियमितपणे कानातील मळ काढायला हवा. पण हा मळ काढण्याची योग्य पद्धत कोणती ते समजून घेऊया. 

१. तेल

कानातला मळ कोरडा असेल तर तो निघणे अवघड असते. अशावेळी बदामाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑईल थोडे कोमट करुन ते कानात टाकावे. त्यामुळे मळ एकत्र होण्यास आणि थोडा ओलसर होण्यास मदत होते. त्यानंतर तो कानकोरणे किंवा कॉटनच्या साह्याने काढणे सोपे जाते. 

२. कोमट पाणी 

कोमट पाणी ड्रॉपरच्या साह्याने कानाच्या पाळीत घालावे. त्यानंतर काही काळ हे पाणी तसेच राहू द्यावे. कानात पाणी असल्याने थोडे अस्वस्थ वाटू शकते. पण काही वेळाने कान उलटा करुन पाणी बाहेर काढावे. यामुळे कानातील मळ निघणे सोपे जाते. तसेच पाण्यामुळे कोणताही अपाय होत नसल्याने यात कोणताही धोका नसतो. 

३. हायड्रोजन पॅरॉक्साईड 

हा कानातील मळ काढण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा घटक आहे. अगदी काही थेंब हायड्रोजन पॅरॉक्साईड पाण्यात मिसळून ते पाणी कानाच्या पाळीत टाकावे. यामुळे कानातील मळ फसफस होऊन बाहेर येण्यास मदत होते. हा उपाय कान साफ करण्यासाठी सर्रास वापरला जाणारा उपाय आहे. 

(Image : Google)

४. कांद्याचा रस 

कांदा वाफ घेऊन किंवा बारीक करुन त्याचा रस तयार करावा. हा रस ड्रॉपर किंवा कापसाने कानाच्या पाळीत घालावा. यामुळे कानातील मळ सहज बाहेर येण्यास मदत होईल. 

५. काय करु नये 

कानातील मळ साफ करण्यासाठी बाजारात कॉटन बड मिळतात. मात्र यामुळे मळ बाहेर येण्याऐवजी आणखी आत जातो. त्यामुळे हे बडस वापरणे शक्यतो टाळलेलेच बरे. कानात किल्ली, सेफ्टीपिन किंवा इतर कोणतीही उपकरणे घालू नयेत. कानाचा पडदा नाजूक असल्याने त्याला इजा झाल्यास हे दुखणे वाढू शकते. त्यामुळे कोणतीही टोकदार गोष्ट कानात घालून कोरु नये.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सस्वच्छता टिप्स