रक्तदाब ही सध्या अतिशय सामान्य समस्या झाली आहे. पूर्वी वयाच्या चाळीशीनंतर होणारा रक्तदाब आता वयाच्या तिशीतच व्हायला लागला आहे. वाढते ताणतणाव, चुकीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि वाढती स्पर्धा यांमुळे रक्तदाबाची समस्या उद्भवत असल्याचे दिसते. कधी कमी रक्तदाबामुळे तर कधी जास्त रक्तदाबामुळे आरोग्याच्या विविध समस्या उद्भवत असल्याचे दिसते. एकदा रक्तदाबाची समस्या मागे लागली की शरीराच्या विविध अवयवांवर परीणाम होत राहतो. हृदय, मेंदू, किडनी हे रक्तदाबाचा परिणाम होणारे काही प्रमुख अवयव आहेत. म्हणूनच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय करणे आवश्यक असते. यासाठी औषधोपचाराबरोबरच आपल्या आहारात काही बदल केल्यास त्याचा अतिशय चांगला फायदा होतो. पाहूयात आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. Pubmed Central वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार हे पदार्थ कोणते ते पाहूया (How To Control Blood Pressure Diet Tips)...
१. टोमॅटो
टोमॅटोमध्ये लाइकोपीन हा घटक असतो. यामुळे रक्त वाहण्याची किंवा पातळ होण्याची क्रिया नियंत्रणात आणण्यास मदत होते. हृदयरोग किंवा त्यामुळे उद्भवणाऱ्या इतर समस्या नियंत्रणात आणण्यासाठी हा घटक फायदेशीर असतो. टोमॅटो सहज उपलब्ध होणारा घटक असून सॅलेड म्हणून किंवा इतर पद्धतीने टोमॅटोचा आहारात समावेश करायला हवा.
२. डाळी
डाळींमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते म्हणून डाळींचा आहारात जास्तीत जास्त समावेश करायला हवा असे आपण नेहमी ऐकतो. पण प्रोटीनबरोबरच डाळींमध्ये ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवणारेही घटक असतात.
३. गाजर
गाजर हा सॅलेडमधील एक उत्तम प्रकार आहे. त्यामध्ये फेनोलिक अॅसिड हा एक अतिशय महत्त्वाचा घटक असतो. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
४. चिया सिडस आणि जवस
तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर तुमच्या स्वयंपाकघरात चिया सिडस आणि जवस या गोष्टी अवश्य असायला हव्यात. या दोन्ही घटकांतून शरीराला पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर मिळते. ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासाठी या दोन्ही गोष्टी अतिशय उपयुक्त असतात.