Join us   

शुगर कायम नियंत्रणात ठेवायची तर न चुकता करा ५ गोष्टी, डायबिटिसचं टेंशन होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2023 1:58 PM

How To Control Blood Sugar Diabetes : शुगर नैसर्गिकरित्या नियंत्रणात ठेवायची असेल तर काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे

डायबिटीस आणि रक्तातील वाढलेली साखर हे आता अतिशय सामान्य झाले आहे. हल्ली अगदी वयाच्या चाळीशीपासून डायबिटीस असलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डायबिटीस हा आजार नसून ती जीवनशैलीविषयक समस्या झाली आहे. वाढते ताणतणाव, खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती, अनुवंशिकता, व्यायामाचा अभाव यांमुळे डायबिटीस असणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शुगर नियंत्रणात असेल तर ठिक नाहीतर आरोग्याची गुंतागुंत वाढत जाते. रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असेल तर शरीरावर झालेल्या जखमा लवकर बऱ्या न होणे, शुगरमुळे किडणी, यकृत यांच्यावर परीणाम होऊन हे अवयव निकामी होणे, डोळ्यांच्या समस्या अशा एक ना अनेक तक्रारी निर्माण होतात. शुगर जास्त असेल तर औषधे आणि इन्शुलिन घ्यावे लागते. मात्र ही शुगर नैसर्गिकरित्या नियंत्रणात ठेवायची असेल तर काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे, त्या कोणत्या पाहूया (How To Control Blood Sugar Diabetes)...

१. अजिबात खाऊ नका ४ फळं

ज्यांना रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायची आहे आणि वजनही नियंत्रणात ठेवायचे आहे अशांनी चिकू, आंबा, केळी आणि द्राक्षं ही फळं अजिबात खाऊ नयेत. मात्र इतर फळं खायला हरकत नाही, त्यामुळे साखर नियंत्रणात राहून भूक शांत करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. 

२. दररोज योगा करा 

शरीर लवचिक करण्यासाठी आणि ताणतणाव दूर करण्यासाठी योग अतिशय फायदेशीर ठरतो. तसेच रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास योगा फायदेशीर असतो. म्हणून नियमितपणे योगा करायला हवा. 

३. रोज ३५ मिनीटे चाला

चालणे हा एक उत्तम व्यायामप्रकार आहे हे आपण अनेकदा ऐकतो किंवा वाचतो. मात्र रोजच्या व्यापात आपण चालतोच असे नाही. मात्र शरीर अॅक्टीव्ह राहावे यासाठी नियमितपणे ३५ मिनीटे चालायला हवे. चालल्याने नैसर्गिकरित्या इन्शुलिनची निर्मिती होते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

४. सूप आणि भाज्यांचे सेवन

प्रत्येकानेच आहारात भरपूर प्रमाणात भाज्यांचे सेवन करायला हवे. भाज्या उकडून आणि सूपच्या स्वरुपात घेतल्यास त्याचा जास्त चांगला फायदा होतो. शरीरातील फॅटस आणि साखर नियंत्रणात राहण्यासाठी भाज्या खाणे फायदेशीर ठरते. 

५. तेल, तूप विसरा 

ज्याची शुगर कायम वाढलेली असते अशांनी शक्यतो आहारात तेल आणि तुपाचा वापर अजिबात करु नये. आपण तेल आणि तुपाच्या माध्यमातून शरीरात फॅटस घेतो आणि त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास अडथळे येतात. नियमितपणेही तेल आणि तूप न खाल्ल्यास रक्तातील साखर कायम नियंत्रणात राहील.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समधुमेह