डायबिटीस ही गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलेली समस्या आहे. अगदी लहान वयातील मुलांपासून ते ज्येष्ठ नागरीकांपर्यंत अनेकांना या समस्येचा त्रास होत असल्याचे चित्र आहे. डायबिटीस हा आजार नसून ती जीवनशैलीविषयक समस्या आहे हे आता अनेकांना मान्य होत आहे. पण भारतासारख्या देशात या समस्येचे वाढणारे रुग्ण ही चिंतेची बाब असल्याचे दिसते. डायबिटीस एकदा झाला की तो बरा होण्याची शक्यता फारच कमी असते. पण नियमित औषधोपचार, व्यायाम, आहारावर नियंत्रण यांसारख्या गोष्टींनी डायबिटीस नियंत्रणात ठेवता येणे शक्य असते (How To Control Diabetes 4 tips).
मात्र या गोष्टींकडे वेळीच लक्ष दिले नाही तर मात्र रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि आरोग्याच्या गुंतागुंती वाढत जातात. अनेकदा डायबिटीसमुळे किडणीवर, डोळ्यांवर, हृदयावर, यकृतावर विपरीत परीणाम होतो आणि त्यामुळे हे अवयव कालांतराने निकामी होण्याचीही शक्यता असते. असे होऊ नये म्हणून वेळीच योग्य ती काळजी घेतली तर आरोग्य चांगले राहण्यास आणि पर्यायाने वाढण्यास मदत होते, अन्यथा डायबिटीसमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत जातात. म्हणूनच डायबिटीस असलेल्यांनी शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. या गोष्टी कोणत्या पाहूया...
१. आहाराची भूमिका महत्त्वाची
डायबिटीस असणाऱ्यांनी गोड पदार्थ, भात, मैदा यांसारखे पदार्थ आहारात घेऊ नयेत हे बरोबरच आहे. मात्र त्याबरोबरच प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटस यांचे आहारातील प्रमाण वाढवायला हवे. या दोन्ही गोष्टींमुळे एनर्जी लेव्हल टिकून राहण्यास मदत होते. याशिवाय आहारात हेल्दी फॅटसचे प्रमाणही वाढवायला हवे. ओमेगा ३ फॅटी अॅसिडस असतील अशा पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. जंक फूडचे प्रमाण कमी करायला हवे.
२. व्यायामाकडे लक्ष हवे
आरोग्य उत्तम ठेवायचे तर व्यायामाला पर्याय नाही. हे आपल्याला माहित असूनही अनेकदा आपल्याकडून व्यायामाचा कंटाळा केला जातो. मात्र असे करणे डायबिटीस असणाऱ्यांसाठी अजिबात फायदेशीर नसते. व्यायामाचा केवळ शरीरालाच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही फायदा होतो हे लक्षात घ्यायला हवे.
३. वजनावर नियंत्रण मिळवणे गरजेचे
वाढते वजन ही आजकाल बहुतांश जणांसाठी महत्त्वाची समस्या झाली आहे. बैठे काम, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे वजन वाढते आणि त्याचा रक्तातील साखर वाढण्यावर परीणाम होतो. त्यामुळे व्यायाम, जंक फूडचे कमीत कमी सेवन यांसारख्या गोष्टींकडे आवर्जून लक्ष देऊन वजन नियंत्रणात राहील याकडे डायबिटीस असणाऱ्यांनी आवर्जून लक्ष द्यायला हवे.
४. तपासण्या आणि औषधोपचार
शुगर असेल तर नियमित तपासण्या करणे आणि डॉक्टरांशी सल्लामसलत करुन नियमितपणे औषधे घेणे या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. पण याकडे दुर्लक्ष केले तर मात्र रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची आणि त्यामुळे इतर त्रास होण्याची शक्यता जास्त असते.