Join us   

रक्तातील साखर कमी करण्यासाठी रोज फक्त ७ मिनिटं करा १ सोपा व्यायाम...शुगर राहील नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2023 3:59 PM

How To Control Diabetes Sugar level : रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यासाठी उपयुक्त व्यायामप्रकार...

डायबिटीस ही सध्या अतिशय मोठी समस्या झाली आहे. अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत अनेकांना डायबिटीस असतो. एकदा डायबिटीस मागे लागला की तो नियंत्रणात ठेवण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो. कारण डायबिटीस ही शरीरात अतिशय हळूवारपणे पसरणारी समस्या आहे. रक्तातील साखर नियंत्रणात नसेल तर विविध अवयवांवर त्याचा परीणाम होतो आणि शरीरिक गुंतागुंत वाढत जाते. म्हणूनच साखर नियंत्रणात ठेवणे हे एक मोठे आव्हान असते. त्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे, औषधोपचार करणे, नियमित व्यायाम करणे या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला हवे. व्यायामामध्ये चालणे, जिम, सायकलिंग, योगा असा कोणत्याही प्रकारचा व्यायाम आपण करु शकतो (How To Control Diabetes Sugar level).

 मायग्रेनच्या त्रासाला वैतागलात? ३ सोपे उपाय, डोकेदुखीपासून मिळेल आराम...

टाइप १ डायबिटीसचे प्रमाण गेल्या काही वर्षात वेगाने वाढते आहे. जगभरात टाइप १ डायबिटीस असणाऱ्यांमध्ये भारत दुसऱ्या स्थानावर असून या रुग्णांमध्ये मागच्या जवळपास ३५ वर्षांत १५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणजेच सहा व्यक्तींपैकी एका व्यक्तीला डायबिटीस असल्याचे इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या २ वर्षात कोविडवरील उपचारांचा साईड इफेक्ट म्हणून होणाऱ्या डायबिटीसच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सुरुवातीला ठराविक वयानंतर होणारा टाईप २ डायबिटीस आता लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये वाढल्याचे दिसते. ही चिंतेची बाब असल्याचे ICMRचे म्हणणे आहे. गेल्या काही वर्षात २५ ते ३४ या तरुण वयोगटातील शहरी आणि ग्रामीण व्यक्तींना डायबिटीस होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

(Image : Google)

कोणता व्यायाम ठरतो फायदेशीर? 

डायबिटीसच्या उपचारांमध्ये सर्व गोष्टींची योग्य पद्धतीने काळजी घेत असताना चालण्याचा व्यायाम अवश्य करायला हवा असे सांगतिले जाते. याबरोबरच योगा, प्राणायाम यांसारखे व्यायामप्रकारही अवश्य करायला हवेत. त्याशिवाय सोलियस पुशअप हा अतिशय फायदेशीर ठरणारा व्यायामप्रकार असून तो नियमितपणे केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे. नियमितपणे साधारण ७ मिनीटे हा व्यायाम केल्यास रक्तातील ५२ टक्के साखर जळण्यास मदत होते. 

 

हा व्यायाम नेमका कसा करायचा? 

आपले पाय जमिनीवर राहतील असे ठेवून गुडघ्यात 90 अंशाचा कोन करुन बसा. पायाची बोटे जमिनीवर घट्ट दाबा आणि टाचा शक्य तितक्या उंच करा आणि पुन्हा खाली करा. हा व्यायाम बसून काम करताना, टीव्ही पाहताना, केव्हाही करु शकता. एकावेळी किमान १० ते १५ वेळा हा व्यायाम करायला हवा. उभे असताना, सोलियस स्नायूचे आकुंचन होत नाही त्यामुळे हा व्यायाम बसूनच करावा लागतो. तसेच, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या, स्मृतिभ्रंश इत्यादींवरही हा व्यायाम अतिशय उपयुक्त ठरतो. बैठी जीवनशैली असलेल्या लोकांसाठी किंवा जे बसून खूप काम करतात त्यांच्यासाठी हा व्यायाम प्रामुख्याने करायला हवा. आहार आणि व्यायामाचा जीवनशैलीत समावेश केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलफिटनेस टिप्सव्यायाम