रक्तदाबाची समस्या आता दिवसेंदिवस खूपच जास्त वाढते आहे. याला कारण अर्थातच आपली बदललेली जीवनशैली, जंकफूडचं वाढलेलं प्रमाण, कामाचा- करिअरचा वाढलेला ताण. यासगळ्या गोष्टींचा परिणाम तब्येतीवर होतोच. त्यातुनच अनेकांना कमी वयातच रक्तदाबाचा (Simple solution to control BP) त्रास जडला आहे. रक्तदाबाविषयी करण्यात आलेल्या काही अभ्यासानुसार भारतात ३० टक्के तरुणांना उच्च रक्तदाबाचा (High blood pressure) त्रास आहे. यामध्ये ग्रामीण भागातल्या तरुणाईचं प्रमाणही उल्लेखनीय आहे, हे विशेष. त्यामुळे आता अगदी कमी वयापासूनच रक्तदाब नियंत्रित (How to Control High blood pressure) ठेवण्यासाठी जीवनशैलीत योग्य बदल करणं गरजेचं झालं आहे.
उच्च रक्तदाबामुळे होणारे आजार
उच्च रक्तदाब म्हणजे हृदयाला अधिक ताकद लावून रक्ताचं पंपिंग करावं लागणं. यामुळे रक्त गरजेपेक्षा जास्त वेगात रक्तवाहिन्यांमधून ढकललं जातं. यामुळे किडनीचे विकार, हृदयविकार, हार्टअटॅक, स्ट्रोक येणं, डिमेंशिया, रक्तवाहिन्यांचे आजार असे अनेक आजार उद्भवतात.
रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी..
द मिरर यांच्या वृत्तानुसार इंग्लंड येथील डॉ. मोनिका वासरमॅन यांनी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी एक महत्त्वपुर्ण आणि प्रत्येकाला अगदी सहज शक्य होईल, असा उपाय सुचवला आहे. त्या म्हणतात की रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मी माझ्या सगळ्याच रुग्णांना दिवसांतून ८ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देते. यामागचं कारण त्या असं सांगतात की शरीर डिटॉक्स करण्यासाठी म्हणजेच शुद्ध करण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. भरपूर पाणी प्यायल्यामुळे शरीरातलं अतिरिक्त सोडियम शरीराबाहेर टाकण्याची क्रिया सोपी होते. सोडियम हे रक्तदाब वाढविण्यासाठी जबाबदार असतं. त्यामुळे ते शरीराबाहेर पडल्याने रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे दिवसभरातून ८ ग्लास किंवा मग दोन ते अडीच लीटर पाणी प्रत्येक प्रौढ व्यक्तीने प्यायलाच हवं.
या लोकांना रक्तदाबाचा धोका
- ज्या लोकांचं वजन जास्त आहे.
- जे लोक मीठ जास्त प्रमाणात खातात.
- फळं, पालेभाज्या कमी प्रमाणात खाणे
- पुरेसा व्यायाम न करणे
- मद्यपान तसेच कॉफी खूप जास्त प्रमाणात घेणे
- जे पुरेशी झोप घेत नाही.
- ज्या लोकांना खूप जास्त वेळ धुळ, धूर, प्रदुषण यांचा सामना करावा लागतो.