गणपतीचे दिवस म्हटलं की प्रसाद म्हणून किंवा गौरी जेवणाच्या निमित्ताने का होईना गोड खाणं होतंच. मोदक, मिठाई, पुरणपोळी असे सगळे गोड प्रकार या काळात भरपूर खाल्ले जातात. बाकी सगळ्यांसाठी ठिक आहे पण ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी हा काळ फार जिकरीचा असतो. प्रसाद असल्याने आणि आवडीचे पदार्थ असल्याने नाही म्हणता येत नाही. आणि खाल्ले तर शुगर ट्रिगर होण्याची शक्यता असते. अशावेळी तोंडावर आणि मनावर कंट्रोल ठेवणे अतिशय महत्त्वाचे असते. नाहीतर सणावाराचा आनंद घेण्याच्या नादात तब्येत बिघडण्याचीच शक्यता जास्त (How To Control Sugar and Diabetes in Ganpati Festival).
डायबिटीस ही सध्या अतिशय सामान्य समस्या असल्याने अगदी कमी वयातील व्यक्तींनाही या समस्येने ग्रासलेले असते. सगळे गोडाधोडावर ताव मारत असताना एका-दोघांनाच गोड खाऊ नका सांगणे बाकीच्यांनाही जीवावर येते. अशावेळी आपण स्वत:हून खाण्यावर नियंत्रण ठेवले तर आपल्याला तर त्याचा त्रास होत नाहीच पण पर्यायाने कुटुंबियांनाही त्रास होत नाही. पाहूयात गणपतीच्या दिवसांत डायबिटीस असणाऱ्यांनी आरोग्याची कशी काळजी घ्यायला हवी...
१. गोड खाण्यावर नियंत्रण ठेवणे हाच सर्वात उत्तम उपाय आहे. मात्र तसे होत नसेल तर प्रसादाच्या वेळी आरतीच्या इथून दूर जाणे, कणभरच प्रसाद घेणे जास्त योग्य ठरेल.
२. बरेचदा नाश्ता किंवा जेवणाच्या वेळी गोड खाल्ले जाते. यावेळी आधीच आपल्या ताटात इतरही कॅलरीज वाढवणारे बरेच पदार्थ असतात. त्यामुळे जेवताना गोड पदार्थ कधीच घेऊ नयेत. ब्रेकफास्ट आणि लंच यांच्या मध्ये ११ वाजता किंवा लंच आणि डीनर यांच्या मध्ये ५ वाजता योग्य प्रमाणात गोड पदार्थ खाल्ला तरी चालतो.
३. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी दुपारच्या नंतर म्हणजेच संध्याकाळी स्नॅक्स म्हणून किंवा रात्रीच्या जेवणाच्या वेळी गोड खाणे शंभर टक्के वर्ज्य करावे. कारण संध्याकाळी आपला मेटाबॉलिझम नैसर्गिकरीत्या मंद होतो. अशावेळी मधुमेहींनी गोड खाल्ले तर साखरेचे नियमन अपूर्ण राहिल्याने रक्तातील साखर जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता असते.
४. एखाद्या दिवशी जास्त गोड आणि तेलकट, मसालेदार पदार्थ खाणे झाले असल्यास त्या दिवशी अवश्य व्यायाम नेहमीपेक्षा थोडा जास्त करायला हवा. म्हणजे कॅलरीज बर्न होतात. नियमित व्यायामाने हॉर्मोन्स सुधारतात आणि शरीरातील इन्शुलिनची पातळीही वाढण्यास मदत होते.