नाश्ता किंवा जेवण झाल्यावर किंवा कधी काम करताना अचानकच आपल्याला काहीतरी गोड खायची इच्छा होते. यालाच इंग्रजीमध्ये शुगर क्रेव्हींग असे म्हणतात. आपलं पोट तर पुरेसं भरलेलं असतं पण तरीही गोड खावं असं वाटतं. मग आपल्याकडे जे सहज उपलब्ध आहे असे काहीही गोड तोंडात टाकले की आपल्याला बरे वाटते. काहीच नसेल तर अनेक जण अशावेळी चक्क गूळ किंवा साखर खाणे पसंत करतात. (How To Control Sweet Cravings) आपण ऑफीसमध्ये किंवा बाहेर असताना अशी गोड खायची इच्छा झाली तर आपण चहा-कॉफी घेण्याला प्राधान्य देतो. असे सतत गोड खाल्ल्याने वजन तर वाढतेच पण आरोग्याच्या इतरही अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
अचानक गोड खाण्याची इच्छा का होते?
शरीरात रक्तातील साखरेची पातळी असंतुलित आहे आणि आपल्याला अधिक उर्जेची गरज आहे असे यातून दिसून येते. मूड स्वींग व प्रेगन्सी ब्लूज या मानसिक अवस्थांमध्ये देखील अशाप्रकारे अचानक गोड खावेसे वाटते. जेव्हा आपल्याला खूप भूक लागते किंवा मानसिक, भावनिक ताण असतो अशीवेळीही गोड खावेसे वाटते. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे शरीरातील स्टेरोटोनीनची पातळी खालावते. गोड खाल्ले की रक्तातील साखरेची पातळी अधिक वाढते मग आपले स्वादूपिंड मोठ्या प्रमाणावर इन्शुलीन निर्माण करु लागते. मात्र हे तब्येतीसाठी अजिबात चांगले नसते. काही जण घाईगडबडीत सकाळची नाश्ता स्कीप करतात. एका संशोधनानुसार सकाळचा नाश्ता न करणाऱ्यांमध्ये गोड खाण्याची इच्छा जास्त प्रमाणात होते.जर तुम्हाला सतत गोड खावे असे वाटत असेल तर हे तुमच्या आहारात क्रोमीयमची पातळी कमी असण्याचे एक लक्षण असू शकते. क्रोमीयममुळे इन्शुलीनची संवेदनशीलता सुधारते व मेंदूच्या स्टेरोटोनीन, नोरेपीनफ्रीनच्या पातळीमध्ये सुधारणा होते.
गोड खाणं टाळण्यासाठी उपाय
१. आहारात प्रोटीनचे प्रमाण योग्य असेल तर अचानक बूक लागणे, काहीतरी गोड खावेसे वाटणे अशा इच्छा होत नाहीत. त्यामुळे आहारात प्रोटीनचे प्रमाण जास्त ठेवायला हवे. यासाठी आहारात डाळी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, अंडी यांचा समावेश असायला हवा. तसेच विविध खनिजे आणि जीवनसत्त्वांची कमतरता असेल तरी सतत गोड खावेसे वाटते. त्यामुळे ठराविक कालावधीनंतर आपल्या शरीरातील सर्व घटक योग्य प्रमाणात आहेत ना याची तपासणी करायला हवी.
२. चहा किंवा कॉफी पीत असाल तर ठरवून त्यामध्ये साखर कमी प्रमाणात घालणे. आधी ३ चमचे घालत असाल तर २ चमचे घालण्याची सवय लावावी. त्यानंतर हळूहळू ही सवय १.५ चमचा मग एक चमच्यावर आणावी. त्यामुळे नकळत तुमच्या शरीरात कमीत कमी साखर जाईल. चहा-कॉफीमधून बहुतांश वेळा जास्त साखर पोटात जात असल्याने ते आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकते.
३. गोड खायची इच्छा झाली की शक्यतो फळे खायला हवीत. म्हणजे गोड खाण्याची इच्छाही पूर्ण होते आणि फळेही पोटात जातात. यातही आंबा, केळी, चिकू, द्राक्षे ही फळे जास्त गोड असल्याने या फळांचा समावेश करावा. फळांमधून नैसर्गिक साखर खाल्ली जात असल्याने त्यातून कोणतेही अपाय होत नाहीत हे लक्षात घ्यायला हवे.
४. आपण विकत घेत असलेल्या कोणत्याही पदार्थांवर शुगर अॅडेड असं लिहीलं असेल तर असे पदार्थ खरेदी करणे टाळा. विकतचे पदार्थ जीभेला चांगले लागले तरी यामध्ये असलेल्या जास्तीच्या साखरेमुळे तब्येतीच्या अनेक तक्रारी उद्भवू शकतात. भविष्यात यामुळे काही समस्या निर्माण झाल्या तर सांगता येत नाही.
५. गोड खायची इच्छा झाली की गुलकंद, मध, मनुके किंवा बेदाणे, खजूर असे नैसर्गिक गोडवा असणारे पदार्थ खायला हवेत. त्यामुळे यातून तुलनेने कमी साखर खाल्ली जाईल आणि तब्येत चांगली राहण्यास मदत होईल.