थायराॅईडचा त्रास असणाऱ्या बहुतांश लोकांना वजनाची समस्या असतेच. काही जणांचे वजन खूप जास्त वाढते, तर काही जणांचे वजन कमी होते. थायराॅईड असताना वजन वाढणे (weight gain in thyroid) हे एकप्रकारे हा आजार कमी होत आहे, याविषयीचा संकेत असतो. पण आजार कमी होत असला तरी वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणे (weight control), खूप गरजेचे असते. कारण एकतर या आजारात वजन वाढीचा वेग खूप जास्त असतो आणि त्यामानाने मग वाढलेले वजन कमी करण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागते. त्यामुळेच ही काही पथ्ये पाळा. थायरॉईड आणि वाढते वजन दोन्हीही नियंत्रणात राहण्यास मदत होईल. (3 simple solutions to control weight in thyroid)
वजन कमी करण्यासाठी...
१. साखर आणि कार्बोहायड्रेट्सवर नियंत्रण
साखर असणारे गोड पदार्थ जेवढे कमी खाता येतील, तेवढे या लोकांसाठी अधिक चांगले असते. ऑरेगन स्टेट युनिर्व्हसिटीच्या अभ्यासानुसार हाय ग्लायसेमिक इंडेक्स असणारे पदार्थ शरीरावरील सुज वाढवतात आणि पुढील कित्येक दिवस शरीर फुललेले दिसते. त्यामुळे गोड पदार्थ कमीच खावेत. तसेच कार्बोहायड्रेट्सच्या प्रकारांपैकी सांगताना हार्मोन डिसऑर्डर एक्सपर्ट केली ॲस्टीन म्हणतात की थायरॉईडमुळे वजन वाढत असल्यास सिंपल कार्ब्स खाणे टाळावे. याऐवजी कॉम्प्लेक्स कार्ब्स असणारे पदार्थ खाऊ शकता.
२. एकदम खूप जेवू नका
थायराॅईडमुळे वजन वाढत असल्यास दोन वेळा जेवण करणे आणि ते ही अगदी पोटभर, असं करू नये. कारण यामुळे वजन खूप लवकर वाढत जाते. याऐवजी दिवसातून ४ वेळा खा. दोन वेळा पोटभर जेवण्यापेक्षा ४ ते ५ वेळेला थोडं थोडं करून खा. यामुळेही वजन कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होईल. तसेच जेवणातून प्रोटीन्स आणि कॉम्प्लेक्स कार्ब्स असणारे पदार्थ अधिकाधिक घेण्याचा प्रयत्न करा.
३. व्यायाम करा
थायराॅईडचे प्रमाण कमी असो किंवा मग जास्त असो. वजन कमी करायचे असेल तर अशा लोकांनी काही ना काही व्यायाम करणे अतिशय गरजेचे आहे. नियमित व्यायाम केल्यामुळे वजन तर नियंत्रित राहतेच पण थायरॉईडही संतुलित राहण्यास किंवा कमी होण्यास मदत होते. त्यामुळे तुमच्या रोजच्या कामातून १५ ते २० मिनिटांचा वेळ तरी स्वत:ला द्या आणि अधिकाधिक व्यायाम करा. बाकीचा व्यायाम होत नसेल तर सायकलिंग, वॉकिंग किंवा घरच्याघरी सुर्यनमस्कार तरी करायलाच पाहिजेत.