थायराॅइडच्या समस्येत विशेषत: हायपोथायराॅयडिज्ममध्ये (weight gain in hypothyroidism) वजन वाढण्याच्या समस्येलाही सामोरं जावं लागतं. हायपोथायराॅयडिज्ममध्ये गोळ्या औषधांसोबतच आहाराचे नियम पाळणंही (diet rules in hypothyroidism) आवश्यक आहे. याबाबत आहारतज्ज्ञ सिमरन सैनी यांनी काय खावे आणि काय खाऊ नये याबाबत मार्गदर्शन केलं आहे. थायराॅइड ग्रंथी मानवाच्या शरीरातील चयापचयाची क्रिया नियंत्रित करते. हायपोथायराॅयडिज्ममध्ये चयापचयाची क्रिया संथ होते. यामुळे शरीरातील उष्मांक कमी जळतात आणि वजन वाढतं. पण या समस्येत आहाराच्या बाबतीत सजग राहिल्यास , काय खावं, काय खाऊ नये याचे नियम काटेकोर पाळल्यास वजन नियंत्रित करणं ( how to control weight in hypothyroidism) ही अवघड बाब राहात नाही.
Image: Google
काय खाऊ नये?
1. सिमरन सैनी सांगतात की हायपोथायराॅयडिज्मच्या समस्येत सोयाबीन खाणं टाळावं. सोयाबीनमध्ये ॲस्ट्रोजन असतं. ॲस्ट्रोजन हे संप्रेरक थायराॅइड ग्रंथीच्या कामकाजात अडथळा निर्माण करत.
2. कोबी, ब्रोकोली सारख्या भाज्या खाणं टाळावं.
3. हायपोथायराॅयडिज्मची समस्या असल्यास पनीर, बटर, जंक फूड यासारखे फॅटस असलेले पदार्थ खाणं टाळावं. या पदार्थांमुळे वजन पटकन वाढतं.
4. काॅफीचं अधिक प्रमाणात सेवन टाळावं. कारण काॅफीमधला कॅफीन हा घटक थायरोक्सिन हार्मोनच्या निर्मितीस अडथळा निर्माण करतं.
5. जवस अति प्रमाणात खाणं हायपोथायराॅयडिज्म समस्येत धोकादायक असतं.
Image: Google
काय खावं?
1. सफरचंद खाणं हायपोथायराॅयडिज्म समस्येत फायदेशीर मानलं जातं. कारण सफरचंदात फायबर आणि क जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असतं.
2. बेरी गटातील फळं खावीत. स्ट्राॅबेरी खाण्याचा सल्ला दिला जातो. बेरी आणि स्ट्राॅबेरी फळांमध्ये ॲण्टिऑक्सिड्ण्टसचं प्रमाण भरपूर असतं त्याचा फायदा थायराॅइड ग्रंथीला होतो.
3. संत्री खाव्यात. संत्र्यामध्ये क जीवनसत्व असतं. हायपोथायराॅयडिज्म समस्येत वजन कमी करण्यासाठी संत्री खाण्याचा सल्ला दिला जातो.
4. अननसात क जीवनसत्व आणि ब्रोमेलिन हे विकर असतं. वजन कमी करण्यासाठी या विकराचा खूप फायदा होतो त्यामुळे अननस अवश्य खावं.
खाण्यापिण्याच्या सवयीत बदल केल्यास, आहाराची पथ्यं पाळल्यास हायपोथायराॅयडिज्म या समस्येतही वजन नियंत्रित ठेवणं अवघड नाही असं सिमरन सैनी म्हणतात.