Join us   

दिवाळीनंतर कसं कराल घरच्याघरी बॉडी डीटॉक्स; घ्या ३ सोप्या रेसिपी, तब्येतीत दिसेल बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2022 5:07 PM

How To Detox Body After Diwali Ayurvedic Remedy : अपचनाच्या तक्रारी दूर होण्यास मदत तर होतेच पण बद्धकोष्ठता, अॅसिडीटी यांसारखे त्रासही दूर होतात.

ठळक मुद्दे तुम्हालाही आपली बॉडी डीटॉक्स करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीही नक्कीच उपयुक्त ठरु शकतो. मागच्या ८ ते १० दिवसांत तुमचे वजन वाढले असेल तर ते घटण्यासही या पेयांचा चांगला उपयोग होतो.

दिवाळी झाली, भरपूर खाणं-पिणं, आराम, खरेद्या, फिरणं, जागरणं सगळं मनसोक्त झालं असेल. आता दिवाळीनंतर येणाऱ्या थंडीच्या सीझनला सामोरे जाण्याआधी आरोग्य चांगले राहावे असं वाटत असेल तर बॉडी डीटॉक्स करणे हा उत्तम पर्याय आहे. आता बॉडी डीटॉक्स करायची म्हणजे नेमकं काय आणि ती कशी करायची हे समजून घेणे गरजेचे आहे. दिवाळी म्हटली की आपण फराळाचे पदार्थ, मिष्टान्न आणि मित्रमंडळींना भेटल्यामुळे किंवा प्रवासाला गेल्यामुळे बाहेरचे पदार्थ खातो. अनेकदा शरीराला आवश्यकता नसताना जीभेला चांगले लागते म्हणून प्रमाणापेक्षा जास्त खाल्ले जाते. खाताना आपल्या लक्षात येत नसले तरी नंतर याचे चरबीत किंवा अनावश्यक घटकांमध्ये रुपांतर होते (How To Detox Body After Diwali Ayurvedic Remedy). 

(Image : Google)

त्यामुळे आयुर्वेदात पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी काही पेय सांगितली आहेत. यामुळे अपचनाच्या तक्रारी दूर होण्यास मदत तर होतेच पण बद्धकोष्ठता, अॅसिडीटी यांसारखे त्रासही दूर होतात. तसेच मागच्या ८ ते १० दिवसांत तुमचे वजन वाढले असेल तर ते घटण्यासही या पेयांचा चांगला उपयोग होतो. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार याविषयी आपल्याला माहिती देतात. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांनी याविषयीची एक पोस्ट नुकतीच केली असून तुम्हालाही आपली बॉडी डीटॉक्स करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीही नक्कीच उपयुक्त ठरु शकतो. पाहूया ही पेय कोणती आणि ती कशी तयार करायची.

१. धणे-कडीपत्ता चहा

१ चमचा धणे, अर्धा चमचा बडीशोप, १० कडीपत्त्याची पाने, ५ पुदीन्याची पाने, १ इंच किसलेलं आलं २ ग्लास पाण्यात घालायचे. त्यानंतर मध्यम आचेवर हे पाणी ७ ते १० मिनीटे उकळायचे. त्यानंतर हे गाळून त्यामध्ये लिंबू पिळून सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी हे पेय घ्यायचे. 

२. ताक 

ताक हे आयुर्वेदातील एक अतिशय उत्तम गुणधर्म असलेले पेय आहे. पाव कप दही आणि १ कप पाणी घालून त्याचे चांगले घुसळून ताक करायचे. त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार हिंग, मीठ, जीरपूड असे काहीही घालू शकता. हे ताक जेवणानंतर अर्धा तासाने न चुकता प्यायला हवे. त्यामुळे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. 

३. धणे-जीरे बडीशोपचा चहा

प्रत्येकी १ चमचा धणे, जीरे आणि बडीशोप घेऊन १ ग्लास पाण्यात ५ ते ७ मिनीटांसाठी उकळावे. तुम्ही यामध्ये १ चिमूट हळदही घालू शकता. हळद त्वचेसाठी अतिशय चांगली असल्याने आणि डीटॉक्सिफिकेशनसाठीही हळदीचा उपयोग होत असल्याने त्याचा चांगला उपयोग होतो. हे मिश्रण उकळल्यानंतर गाळून एक एक घोट हळूहळू घेत राहावे. जेवणानंतर १ तासाने हे पेय घ्यावे. एका दिवसात हे पेय २ ते ३ वेळा घेतल्यास चालू शकते.     

टॅग्स : आरोग्यलाइफस्टाइलहेल्थ टिप्स