Join us   

शरीरातील विषारी घटक बाहेर टाकायचे? फक्त ५ स्टेप्स सोपं बॉडी डीटॉक्स, उन्हाळा होईल सुसह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2023 5:59 PM

How To Detoxify body at Home : अनावश्याक गोष्टी शरीरातून बाहेर पडल्या तरच आपली पचनसंस्था आणि एकूण आरोग्य चांगले राहू शकते.

आपण सकाळी उठल्यापासून वेगवेगळे पदार्थ खातो आणि काही ना काही पेय पितो. हे सगळे आपल्या शरीराला आवश्यक असतेच असे नाही. शरीराला आवश्यक असणाऱ्या घटक शरीर घेते आणि अनावश्यक घटक लघवी आणि विष्ठेच्या माध्यमातून बाहेर टाकले जातात. या दोन्ही क्रिया व्यवस्थित असल्या की आपले शरीर स्वच्छ होते किंवा निरोगी आहे असे आपल्याला वाटत राहते. मात्र या दोन्ही गोष्टींशिवायही अनेक घटक शरीरात असतात. जे घटक शरीराबाहेर पडले नाहीत तर आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. यामध्ये शरीरात असणारे विविध धातू, टॉक्सिन्स अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. या गोष्टी शरीरातून बाहेर पडल्या तरच आपली पचनसंस्था आणि एकूण आरोग्य चांगले राहू शकते. बॉडी डीटॉक्स करण्याच्या प्रक्रियेत शरीरातील हेच अनावश्यक घटक बाहेर टाकले जातात.  डॉ. डींपल जांगडा आपल्या इन्स्टाग्राम पेजवरुन याविषयी अतिशय महत्त्वाच्या टिप्स शेअर करतात, त्या कोणत्या पाहूया (How To Detoxify body at Home)...

१. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना न चुकता कोमट पाण्यात १ चमचा तूप घालून हे पाणी प्यायचे. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. 

२. काही दिवस म्हणजेच किमान ३,५,७,११ असे दिवस दुपारचे आणि रात्रीचे जेवण ठराविक असा एखादाच हलका पदार्थ पुन्हा पुन्हा खायचा. यामुळे लिव्हर डीटॉक्सिफाय व्हायला मदत होते आणि शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकले जातात. 

३. दररोज न चुकता २ वाट्या फळं आणि २ वाट्या सलाड तुमच्या आहारात असायलाच हवे. यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते आणि फायबरचे प्रमाण वाढल्याने शरीर शुद्ध होण्याची क्रिया सोपी होते. 

४. आपण ठराविक अंतराने चहा किंवा कॉफी घेत असतो. पण त्याऐवजी जीरं, बडीशेप, कोथिंबीर, दालचिनी यांसारख्या आयुर्वेदीक पदार्थांपासून केलेला हर्बल चहा प्या. यामुळे पचनरस चांगल्या प्रमाणात तयार होण्यास मदत होईल. 

५. इंटमिटंट फास्टींग म्हणजेच २ खाण्यांच्या मध्ये १२ ते १४ तासांचा गॅप ठेवणे. यासाठी सूर्यास्ताच्या वेळी जेवायचे आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाल्यानंतर २ ते ३ तासांनी खायचे. असा गॅप ठेवल्याने शरीरावर ताण येत नाही आणि शरीर उत्तमरित्या कार्य करते. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स