दिवसाचे ८ ते ९ तास स्क्रिनवरचे काम आणि त्यानंतर बहुतांश काळ डोळ्यसमोर मोबाइल यांमुळे डोळे अक्षरश: थकून जातात. याशिवाय उन्हाच्या तडाख्याने डोळ्यांची अनेकदा आग-आग होते. प्रदूषण आणि प्रवासादरम्यान डोळ्यात जाणारे कण यांमुळेही डोळ्यांचे आरोग्य खराब होते. यासाठी उन्हाळ्यात बाहेर फिरताना गॉगल वापरावा, स्क्रीनसाठी एखादा चष्मा वापरावा असे सांगितले जाते. ठराविक काळाने डोळ्यांवर पाणी मारावे किंवा हिरव्या रंगाकडे नाहीतर दूर कुठेतरी नजर जायला हवी असे वारंवार सांगितले जाते. मात्र कामाच्या व्यापात आपल्याकडून हे सगळे केले जातेच असे नाही (How To Do Eye Cleansing Netra Shuddhi Process) .
मग अचानक डोळ्यांची आग होणे, डोळे चुरचुरणे, लाल होणे, खाज येणे किंवा डोळ्यांना ताण आल्याने डोके दुखणे, डोळे कोरडे पडणे अशा समस्या सुरू होतात. मग डॉक्टरांकडे जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. मात्र असे होऊ नये यासाठी नेत्रशुद्धी ही क्रिया आवर्जून करायला हवी. यामुळे डोळे स्वच्छ तर होतातच पण डोळ्यांना शांत वाटते. पाहूयात ही क्रिया नेमकी कशी करायची आणि त्याचे आपल्याला काय काय फायदे होतात .
नेत्रशुद्धी क्रिया कशी करायची?
डोळ्यांसाठी बाजारात लहान आकाराचे ग्लास मिळतात, त्याला आय कप असे म्हणतात. हे कप नसतील तर २ छोट्या आकाराच्या वाट्या घेतल्या तरी चालू शकते. या कपांमध्ये गुलाब पाणी किंवा साधे पाणी भरायचे. मात्र हे भरताना कप किंवा वाट्या स्वच्छ असतील असे पाहावे. हे कप डोळ्यावर ठेवून त्यात डोळे ८ ते १० वेळा उघडझाप करावेत. गरज वाटत असल्यास हे पाणी टाकून देऊन पुन्हा नवीन पाणी घेऊन पुन्हा तसेच करावे. डोळ्यांना आराम देण्यासाठी आणि शुद्ध करण्यासाठी ही क्रिया अतिशय फायदेशीर आहे.
फायदे काय?
१. आपण अनेकदा डोळ्यांना मेकअप करतो, डोळे नीट साफ केले तरी कोपऱ्यातले काजळ, आयलायनर, आयशॅडो नीट निघतेच असे नाही. मात्र या उपायाने डोळे स्वच्छ व्हायला मदत होते.
२. अनेकदा काही कारणाने आपल्या डोळ्यांतून खूप पाणी येते किंवा कधी डोळे खूप कोरडे होतात. हे दुखणारे डोळे शांत होण्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरतो.
३. स्क्रिनमुळे डोळ्यांना आणि बुबुळांना आलेला ताण कमी करण्यासाठी हा उपाय नियमित करायला हवा.
४. बरेच जण नियमितपणे पोहायला जातात. स्विमिंग टँकमध्ये असणाऱ्या क्लोरीनने डोळ्यांची आग होण्याची शक्यता असते. मात्र या उपायाने हा त्रास दूर होण्यास मदत होते.
५. अनेकदा झोप कमी झाली किंवा जास्त झाली तर आपल्या डोळ्यांना सूज येते. तसेच विविध कारणांनी डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळे तयार होतात. या दोन्ही समस्या दूर होण्यासाठी नेत्र शुद्धी क्रिया फायदेशीर ठरते.
६. डोळ्यांची कोणती शस्त्रक्रिया झाली असेल किंवा डोळ्यांना कोणते इन्फेक्शन झाले असेल, उपचार सुरू असतील तर हा उपाय करणे टाळावे अन्यथा डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा.