Join us   

रात्री पडल्या पडल्या गाढ झोप लागण्यासाठी करा फक्त ४ गोष्टी, सकाळ होईल एकदम फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2023 4:49 PM

How To Fall Asleep Easily Bed Time Routine Tips For Good Night Sleep : प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ हंसाजी योगेंद्र काही महत्त्वाच्या टिप्स शेअर करतात.

रात्रीची गाढ झोप ही आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असते हे आपल्याला माहित आहे. त्यामुळेच एखाद्या रात्री जरी आपली नीट झोप झाली नाही तर आपला पुढचा संपूर्ण दिवस आळसात जातो. म्हणूनच रात्री किमान ७ ते ८ तासांची पूर्ण झोप व्हायला हवी. मात्र कधी आरोग्याच्या तक्रारींमुळे तर कधी ताण असल्याने किंवा मोबाइल, टीव्ही यांसारख्या व्यसनांमुळे आपल्याला रात्री लवकर झोप येत नाही. रात्री झोपायला उशीर झाला की सकाळी उठायला उशीर आणि मग सगळेच रुटीन बिघडून जाते. मात्र अंथरुणावर पडल्या पडल्या गाढ झोप लागावी यासाठी प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ हंसाजी योगेंद्र काही महत्त्वाच्या टिप्स शेअर करतात (How To Fall Asleep Easily Bed Time Routine Tips For Good Night Sleep). 

(Image : Google)

१. मसल रिलॅक्सेशन

दिवसभराच्या कामाने आलेला ताण घालवण्यासाठी याचा अतिशय चांगला उपयोग होतो. पाठीवर झोपून पायाच्या पावलापासून डोक्यापर्यंत प्रत्येक अवयवाला ताण द्या आणि रिलॅक्स करा. ५ सेकंद ताणा आणि त्यानंतर १० सेकंद रिलॅक्स करा. यामुळे शरीर रिलॅक्स होण्यास मदत होते. 

२. दिवसभराची उजळणी करा

दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा घ्या आणि त्यातील सकारात्मक गोष्टी आठवा. यामुळे तुम्हाला आनंदी वाटण्यास मदत होईल. दिवसभरातील कोणत्या गोष्टींसाठी तुम्ही ग्रेटफूल आहात ते आठवा आणि लिहून काढा. 

३. भरपूर पाणी प्या

झोप येण्यासाठी इतर गोष्टी ज्याप्रमाणे महत्त्वाच्या असतात. त्याचप्रमाणे दिवसभर भरपूर पाणी पिणेही तितकेच महत्त्वाचे असते. शरीर चांगले हायड्रेट असेल तर त्याची गाढ झोप येण्यास मदत होते. तसेच तुम्ही किती पाणी पिता याचा तुमच्या झोपेच्या गुणवत्तेवर परीणाम होत असतो. भरपूर पाणी प्यायले तर शरीराचे तापमान नियंत्रणात राहते आणि रक्तप्रवाह सुधारण्यास याची चांगली मदत होते. मात्र झोपताना खूप जास्त प्रमाणातही पाणी पिऊ नये नाहीतर लघवीसाठी सारखे उठावे लागते. 

४. बेडटाईम रुटीन रिलॅक्सिंग असायला हवे

झोपायच्या आधी कोमट पाण्याने आंघोळ करा. शक्यतो मोबाइल पाहू नका. झोपताना चांगली पुस्तके वाचा, गाणी ऐका, काही सोपे स्ट्रेचिंगचे प्रकार करा. यामुळे तुमचा ताण कमी व्हायला मदत होईल आणि शांत, गाढ झोप लागेल.       

टॅग्स : आरोग्यलाइफस्टाइलहेल्थ टिप्स