थंडीचा काळ म्हणजे बाहेर गारेगार हवा आणि अशावेळी जाड पांघरुण अंगाभोवती गुरगुटून झोपलेलो किंवा लोळणारे आपण. बाहेर थंडगार वातावरण असल्याने आपल्याला काहीच करायची इच्छा तर होतच नाही पण एकप्रकारचा आळस भरुन राहतो. इतकेच नाही तर थंडीत आपल्याला सकाळीही लवकर जाग येत नाही. आली तरी पुन्हा पांघरुण अंगावर घेऊन झोपावेसे वाटते. मात्र अंगात आळस असेल तर आपले काम तर नीट होत नाहीच पण उगाचच उदास वाटत राहते आणि ठरवलेली कामेही वेळच्या वेळी मार्गी लागत नाहीत. हा आळस झटकण्यासाठी काहीतरी करायला हवं आणि कामाला लागायला हवं हे आपल्याला कळत असतं पण वळत मात्र नाही. अशावेळी आळस झटकून टाकण्यासाठी काही सोपे उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो आणि आपण दिवसभर ताजेतवाने राहू शकतो. पाहूयात आळस झटकून टाकण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत (How To get Out From Laziness In Winter).
१. व्यायाम
पांघरुणातून बाहेर येऊन व्यायाम करा असे सांगणे सोपे असले तरी प्रत्यक्षात ते करणे सुरुवातीला अवघड जाते. पण स्ट्रेचिंगचे बेसिक व्यायाम केल्यानंतर किमान १२ सूर्यनमस्कार घातल्यास आपला आळस कुठच्या कुठे पळून जाऊ शकतो. इतकेच नाही तर घरातल्या घरात ५० दोरीवरच्या किंवा साध्या उड्या मारल्या, थोडी योगासने केली तरी आळस जाण्यास मदत होते.
२. गरम पाण्याने आंघोळ
आपल्याला खूपच आळस आला असेल आणि काहीच करावेसे वाटत नसेल तर आपण थंडीच्या दिवसांत गरमागरम चहा किंवा कॉफी घेणे पसंत करतो. पण असे करण्यामुळे आपला आळस तात्पुरता जातो मात्र पुन्हा आपल्याला आळसावल्यासारखे वाटते. अशावेळी झोपेतून उठल्या उठल्या गरम पाण्याने आंघोळ केल्यास हा आळस निघून जाण्यास मदत होऊ शकते.
३. गाणी ऐका
आपण अनेकदा कंटाळा आला की आपल्या आवडीची गाणी ऐकतो. त्यामुळे आपल्याला फ्रेश वाटते. थंडीच्या दिवसांत आळस आला तर अशाचप्रकारे आपल्या आवडीची गाणी लावा आणि आपल्या नियोजित कामाला सुरुवात करा. त्यामुळे आपल्याला आलेला आळस नकळत निघून जाण्यास मदत होईल.