Join us   

नुकतंच आजारातून उठलात? कोरोनातून बरं झाल्यावरही थकवा जाणवतोय? ४ उपाय, झटपट होईल रिकव्हरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2022 4:33 PM

Tips To Re-boost Energy After Illness: आजारपण झालं की खूपच थकवा येतो, अंगातली ताकद गेल्यासारखी वाटते. म्हणूनच आधीची उर्जा (energy) पुन्हा मिळविण्यासाठी हे काही उपाय करा, पुन्हा लवकरच फ्रेश व्हाल आणि उत्साह येईल. 

ठळक मुद्दे कोरोना होऊन गेल्यानंतरही थकवा जात नसेल तर हे काही उपाय नक्कीच तब्येत सुधारण्यासाठी मदत करतील.

सध्या कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. आजाराचं स्वरुप गंभीर नसलं तरी त्यामुळे सर्दी, ताप, अशक्तपणा हा त्रास होतोच आहे. ताप आला की अंगातली उर्जा (energy) खूप वेगाने कमी हाेते आणि तिव्र स्वरुपाचा अशक्तपणा (weakness) जाणवू लागतो. याशिवाय सध्या आपण सगळेच ऋतुबदलाचा अनुभव घेत आहोत. बदलतं वातावरण सहन न झाल्यानेही लहान मुलांना, घरातील वृद्ध मंडळींना वेगवेगळे त्रास, आजारपण, सर्दी- ताप (tips from flu recovery) होत आहे. आजारपण झालं की अंगातली शक्ती गेल्यासारखी वाटते. म्हणूनच अशा सगळ्यांसाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी. 

 

ऋजुता दिवेकर सोशल मिडियावर नेहमीच ॲक्टीव्ह असतात. बदलत्या ऋतुमानानुसार आहार कसा असावा, व्यायाम कसा करावा, कोणत्या आजारात काय खावं- काय टाळावं, अशी सगळीत सविस्तर माहिती त्या नेहमीच पोस्ट करत असतात. असाच एक आरोग्यासंबंधी माहिती देणारा व्हिडिओ त्यांनी नुकताच इन्स्टाग्रामला शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी ५ उपाय सांगितले आहेत. कोरोना होऊन गेल्यानंतरही थकवा जात नसेल तर हे काही उपाय नक्कीच तब्येत सुधारण्यासाठी मदत करतील.

 

आजारानंतर आलेला थकवा घालविण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ५ गोष्टी १. लिंबू सरबत अंगातली उर्जा भरून काढण्यासाठी लिंबू सरबत अतिशय गुणकारी ठरतं. लिंबामध्ये असणारं व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करतं. शिवाय त्यातल्या साखरेतूनही भरपूर प्रमाणात ग्लुकोज मिळतं. म्हणून एक ग्लास लिंबूपाणी नियमित घ्या. त्यामध्ये चिमुटभर मिरेपूड टाका. जेणेकरून पचन क्रिया अधिक चांगली होईल, असंही ऋजुता यांनी सांगितलं आहे.

 

२. वरण- भात आणि तूप आजारपणानंतरही अनेक दिवस तोंडाला चव नसते. काही खाण्याची इच्छा होत नाही. तसंच पचनशक्तीही कमी झालेली असते. त्यामुळे या दिवसांत खूप हेवी जेवण टाळावंच. त्यामुळे दुपारच्या जेवणात आवर्जून गरमागरम भात, वरण आणि त्यात चमचाभर तूप असा आहार घ्यावा, असं ऋजुता यांनी सुचवलं आहे.

 

३. केळी आवश्यक शरीराची कमी झालेली उर्जा पुन्हा भरून काढण्यासाठी केळी अतिशय गुणकारी ठरते. केळीमुळे पचनक्रिया तर सुधारते. भरपूर प्रमाणात उर्जा मिळते. केळी एकतर तुमच्या नाश्त्याच्याही सुरुवातीला खा किंवा मग दुपारच्या जेवणानंतर काही वेळाने घ्या, असंही त्यांनी सांगितलं.

 

४. व्यायाम आणि आराम शरीराची झालेली झीज भरून काढायची असेल, तर या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. अंगात ताकद नसते. पण तरीही थोडीतरी शारिरीक हालचाल होणे गरजेचे असते. त्यामुळे या दिवसांत अतिशय हलका- फुलका व्यायाम करा. तसेच भरपूर आराम करा. शांत झोप आणि आराम या दोन्ही गोष्टी तुम्हाला लवकरच फ्रेश आणि एनर्जेटिक बनवतील.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सकोरोना वायरस बातम्याआहार योजना