कॅल्शियम हा फक्त हाडे आणि दातांसाठी उपयुक्त असतो असा आपला समज असतो. हाडे आणि दातांसाठी कॅल्शियम उपयुक्त असला तरी हृदयाचे ठोके नियमित पडणे, रक्ताच्या गुठळ्या होऊ न देणे यांसाठीही शरीरात कॅल्शियमची पातळी पुरेशी असणे आवश्यक असते. शरीरात योग्य प्रमाणात कॅल्शियम (How To Increase Calcium Level Naturally) नसेल तर लहान मुले आणि तरुणांमध्ये आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी उद्भवतात. कॅल्शियमची कमतरता असेल तर कधी फार थकल्यासारखे वाटणे, दातांच्या तक्रारी, सांधेदुखी, त्वचा कोरडी होणे यांसारख्या तक्रारी उद्भवतात. अनेकदा शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असणे हे कॅल्शियम कमी असण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण असते. कारण व्हि़टॅमिन डी मुळे शरीरात कॅल्शियम शोषले जात असते. शरीरच नाही तर केस आणि नखांचे आरोग्यही कॅल्शियमवर अवलंबून असते. आता शरीरात कॅल्शियम वाढवायचा असेल तर आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा ते पाहूया....
१. आवळा
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम यांचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे आवळ्याचे नियमित सेवन केल्यास तब्येत चांगली राहण्यास मदत होते. आपण आवळ्याचे लोणचे, सरबत, कँडी, मोरावळा, कच्चा आवळा असे कोणत्याही स्वरुपात खाऊ शकतो.
२. शेवग्याची पाने
शेवगा आरोग्यासाठी चांगला असतो हे आपल्याला माहित आहे, पण शेवग्याची पानेही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. यामध्ये भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम असते. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी या पानांची पावडर खाणे फायदेशीर असते. ही पाने काहीशी उष्ण असल्याने ज्यांना पित्ताचा त्रास आहे अशांनी ही पाने घेताना काळजी घ्यायला हवी.
३. तीळ
तीळ थंडीच्या दिवसांत उष्णता देण्यासाठी खाल्ले जात असले तरी एरवीही ठराविक प्रमाणात तीळ खाल्लेले चालू शकते. काळ किंवा पांढरे तीळ भाजून त्याची चटणी किंवा लाडू करुन आपण खाऊ शकतो. तीळात कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असल्याने शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरुन काढण्यासाठी तीळाचा आहारात समावेश करायला हवा.
४. दूध
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम पुरेशा प्रमाणात असते. दूध हा सहज उपलब्ध होणारा पदार्थ असल्याने दररोज एक ग्लास दूध प्यायल्यास त्याचा कॅल्शियमची पातळी वाढण्यासाठी चांगला फायदा होतो. त्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी दूध केवळ लहान मुलांनीच नाही तर प्रत्येकाने प्यायलाच हवे.