Join us   

शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता आहे हे सांगणारी ५ लक्षणं, वेळीच लक्ष न देणं अतिशय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2022 5:43 PM

मेंदू, हदय, मज्जातंतूचं कार्य सुरळीत चालण्यासाठी ब 12 (Vitamin B12) जीवनसत्वाची महत्वाची भूमिका असते. शरीरात या जीवनसत्वाची कमतरता ( Effects of Vitamin B 12 deficiency) निर्माण झाल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. हे टाळण्यासाठी वेळीच ब 12 जीवनसत्वाची कमतरता ओळखणं (symptoms of B 12 deficiency) आवश्यक आहे. 5 लक्षणांद्वारे ही कमतरता ओळखता येते. 

ठळक मुद्दे ब 12 जीवनसत्वामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते. ब 12 जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे हदयाच्या आणि मेंदूच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. 

ब 12 हे जीवनसत्व शरीरासाठी अतिशय महत्वाचं असतं. मेंदू, मज्जातंतू आणि हदयाचं कार्य (importance of Vitamin B 12)  सुरळीत चालण्यासाठी ब12 हे जीवनसत्व आवश्यक असतं. शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी, लाल पेशी निर्माण होण्यास चालना मिळण्यासाठी शरीरात पुरेसं ब 12 जीवनसत्व असणं आवश्यक असतं. पण तणाव, पित्ताचा त्रास आणि काही औषधांचा परिणाम होवून शरीरात ब 12 जीवनसत्वाची कमतरता ( Vitamin B 12 deficiency)  निर्माण होते. शरीरात ब 12 जीवनसत्व कमी झाल्यास हीमोग्लोबीन कमी होतं, हदयाच्या, धमण्यांच्या, मेंदूच्या कार्यात अडथळे निर्माण होवून गंभीर परिणाम संभावतात. हे टाळण्यासाठी शरीरातील ब 12 जीवनसत्व कमी झालं आहे हे वेळीच ओळखणं आवश्यक असतं. ब 12 जीवनसत्वाची कमतरता ब्लड टेस्ट केल्यानंतरच कळते असं नाही तर शरीर 5 लक्षणांद्वारे (symptoms of B 12 deficiency) ही कमतरता व्यक्त करत असतं. ही लक्षणं ओळखून वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. 

Image: Google

ब 12 जीवनसत्वाची  कमतरता कशी ओळखाल?

1. हाता पायाला सारख्या मुंग्या येत असतील, हाता पायात  सुया टोचल्या प्रमाणे वेदना होत असतील तर शरीरातील ब 12 जीवनसत्व कमी झालं आहे हे ओळखावं.

2. जिभेवर छाले येणं, जिभेवर लाल चट्टे येणं, जीभ लाल दिसणं हे देखील ब 12 जीवनसत्व कमी असण्याचं लक्षण आहे. 

3. शरीरात ब 12 जीवनसत्वाची कमतरता असल्यास त्वचा पिवळसर पडते.  काविळ होते त्याप्रमाणे शरीर पिवळं पडत नसलं तरी हे पिवळेपण लगेच लक्षात येण्यासारखं असत. त्वचा पिवळी दिसत असल्यास त्वरित डाॅक्टरांकडे जावं. 

Image: Google

4. शरीरातील ब 12 जीवनसत्वाच्या कमतरतेचा परिणम दृष्टीवरही होतो. धुरसट, पुसट दिसतं. पण य लक्षणाकडे मोबाइल, स्क्रीनचा परिणाम म्हणून दुर्लक्ष केलं जातं. पण ब 12 जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे नजर कमजोर होवून दृष्टी दोष निर्माण होतो. 

5. हात लावल्यावरही वेदना जाणवणं हे ब 12 जीवनसत्वाच्या कमतरतेचं मुख्य लक्षण आहे. हात पाय दुखणं, स्नायू दुखणं यामुळे चालण्या फिरण्याच्या, काम करण्याच्या गतीवर परिणाम होतो. सतत वेदनांमुळे शरीर जडावतं, हालचालीत मंदपणा येतो. शरीराद्वारे व्यक्त होणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डाॅक्टरांना गाठून सल्ला घेणं आवश्यक असल्याचं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स