सुचेता लिमये
नवरात्रीचे उपवास सुरु होऊन आता २ दिवस झाले. काही जण धान्य फराळ करतात तर काहीजण फळे ,दूध किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन हे उपवास करतात. काहीजण एक वेळ खाऊन तर काहीजण दिवसभर थोडे थोडे फराळाचे पदार्थ घेतात. आपल्याकडे उपवासाचे महत्त्व पुराण काळापासून सांगितले आहे. उपवास करताना आपल्या पचनसंस्थेला आराम मिळतो यामुळे आपले प्रकृती स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते. हेच जर उद्दिष्ट ठेवले तर त्या दृष्टीने संतुलित आहार घेणे हे आवश्यक असते.
यामुळे शरीरातील विषद्रव्य किंवा टॉक्सिन्सचे प्रमाण कमी होऊन शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. हे सगळे जरी खरे असले तरी तुम्हाला मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असेल तर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपवास करणे आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने किंवा काही न खाता पिता उपवास केले तर रक्तातील साखरेचे प्रमाण एकाएकी खूप कमी जास्त होणे शक्य आहे. यासाठी उपवास करतानाच्या काळात आहारात कशा पद्धतीने बदल करावा यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया (How to Manage Diet In navratri fasting if you have Diabetes)...
१.आहार संतुलित ठेवायला हवा..
व्रत करताना आहार संतुलित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, यासाठी आहारात वैविध्य ठेवले तर शरीराला आवश्यकतेनुसार सर्व पोषक द्रव्यांचा पुरवठा होतो. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासही मदत होते. या काळात दिवसाची सुरुवात दूध व दुधापासून बनवलेले पदार्थ, फळे यांसारख्या गोष्टींनी करावी. राजगिरा, वरई, कट्टूचे पीठ, भाज्या यांचा आहारात जरूर समावेश करावा. २. भरपूर फळे आणि भाज्या खाव्या
भाज्या आणि फळांमध्ये भरपूर प्रमाणात विविध जीवनसत्वे क्षार व अँटिऑक्सिडंट असतात. फळे आणि भाज्यांमध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाणही जास्त असते . अशी फळे आणि भाज्या रक्तातील शर्करा नियमित करण्यास मदत करतात. प्रत्येक वेळी फराळ करताना भाज्या आणि फळांचा समावेश जरूर करावा.
३. फळांचा ज्यूस घेणे टाळा
आपण फळांचा ज्यूस घेतो तेव्हा या एक ग्लास ज्यूससाठी कमीत कमी ३ ते ४ फळांचा रस काढावा लागतो. यातून काही प्रमाणात विटामिन सी मिळते पण बाकीची जीवनसत्वे आणि फायबर मिळत नाही. तसेच ज्यूसमधून फक्त भरपूर प्रमाणात उष्मांक मिळतात, जे रक्तातील साखर वाढवण्यास कारणीभूत ठरतात. याबरोबरच एनर्जी ड्रिंक किंवा सॉफ्ट ड्रिंक्स/ शीतपेय, सर्व प्रकारची शर्करायुक्त सरबते घेणे टाळावे.
४. गोड व तळलेले पदार्थ खाणे टाळावे
नवरात्रीच्या फराळामध्ये साबुदाणे वडे किंवा चिप्स इत्यादी तळलेले पदार्थ आवडीने खाल्ले जातात, ज्यात तेलाचे प्रमाण खूप जास्त असते व मिठाचे प्रमाणही खूप जास्त असते. यामुळे उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना त्रास होऊ शकतो. याचबरोबर दिवसभरात खाल्ले जाणारे एकूण मीठदेखील कमी प्रमाणात घेणे आवश्यक आहे. तसेच साखर व गोड पदार्थ खाणे टाळावे. या ऐवजी आहारात राजगिरा, वरई, कट्टू पीठ याचे थालीपीठ, पनीरपासून बनवलेले पदार्थ, विविध भाज्या, काकडी, भोपळा यांचा आहारात जास्त समावेश करावा
५. दिवसभराचा आहार विभागून घ्यावा
बरेच वेळा उपवास करताना एक वेळेस जेवले जाते. असे केल्याने रक्तातील साखरेचे संतुलन बिघडू शकते आणि एक वेळ जेवल्याने त्यावेळेस खूप भूक लागून जास्त जेवले जाते यापेक्षा दिवसभराचा फराळ ५ ते ६ वेळा विभागून घेतल्यास रक्तातील साखर आटोक्यात राहण्यास मदत होईल.
(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत)