Join us   

उन्हाळ्यात शुगर जास्त आणि लवकर वाढते? हे खरं की खोटं, तज्ज्ञ सांगतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2023 2:37 PM

How to Manage Your Diabetes in Extreme Summer Heat उन्हाळ्यात रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ होते असा एक समज आहे, पण तसं खरंच होतं का?

मधुमेह हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. जेव्हा आपण कार्बोहायड्रेटयुक्त अन्न घेतो तेव्हा ते पोटात ग्लुकोज तयार करते. हे ग्लुकोज रक्तापर्यंत पोहोचते आणि नंतर शरीराच्या प्रत्येक भागात पोहचते. या ग्लुकोजपासून शरीरात ऊर्जा निर्माण होते. याच ऊर्जेने आपण आपली सर्व कामे करतो. ग्लुकोजलाच साखर म्हणतात. या साखरेचे ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी इन्शुलिन हार्मोनची गरज असते, परंतु  पॅंक्रियाजमध्ये तयार होणारे इन्शुलिन कमी होऊ लागले तर मधुमेह हा आजार होतो.

जेव्हा इन्शुलिन कमी होते, तेव्हा ग्लुकोजचे शोषण कमी होते आणि साखर रक्तात मिसळते. ही साखर शरीराच्या प्रत्येक नसामध्ये पसरू लागते. त्यामुळे हृदय, किडनी, डोळे आणि इतर गोष्टींवर परिणाम होतो, व शरीरात अनेक रोगांचा धोका वाढतो(How to Manage Your Diabetes in Extreme Summer Heat).

मधुमेह या आजारात रक्तातील साखरेची पातळीत खूप चढ-उतार होते. काही लोकांच्या मते, उन्हाळ्याच्या दिवसात रक्तातील साखर खूप वेगाने वाढते. पण असे नक्की होते का? या विषयावर न्युज १८ या वेबसाईटने मॅक्स हेल्थकेअर गुडगाव येथील डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर पारस अग्रवाल यांच्याशी बातचीत केली.

जांभूळ खाल्ल्याने खरेच डायबिटिस नियंत्रणात येते? काय खरं - काय खोटं, तज्ज्ञ सांगतात..

उन्हाळ्यात खरंच रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ होते?

यासंदर्भात, डॉक्टर पारस अग्रवाल सांगतात, ''साखर वाढण्याची व कमी होण्याची अनेक कारणे आहेत. आपल्या आहारात, दिनचर्येत किंवा खाण्यापिण्याच्या वेळेत बदल झाले, तर साहजिक ब्लड शुगरमध्ये देखील बदल होते. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांना नेहमी आहार आणि जीवनशैलीत एकसमानता ठेवण्याचा सल्ला दिला जातो.''

ते पुढे म्हणतात, ''उन्हाळ्यात रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ होते, याचा कोणताही पुरावा अद्याप उपलब्ध नाही. उन्हाळ्यात काही लोकांच्या रक्तातील साखरेत वाढ होते. तर काहींची कमी. याला इतर करणे देखील कारणीभूत ठरू शकतात.''

कोणत्या परिस्थितीत साखर वाढते?

डॉ पारस म्हणतात, ''आपण जर मधुमेहग्रस्त रुग्ण असाल, व नियमित व्यायाम करत नसाल, खाण्याच्या सवयीमध्ये बदल असेल तर साखरेच्या पातळीत वाढ होऊ शकते. दुसरीकडे, मधुमेहग्रस्त रुग्ण जे इन्शुलिनवर असतात, इन्शुलिन घेतल्यानंतर जर आपण उन्हात बाहेर पडत असाल तर, इन्शुलिनचा प्रभाव फार लवकर कमी होतो. जर तुम्ही सगळ्या गोष्टी वेळेवर करत असाल तर, ब्लड शुगरमध्ये वाढ होणार नाही.''

चमचाभर ओवा आणि ग्लासभर पाणी, अपचनापासून पोटावर वाढलेल्या चरबीपर्यंत सगळ्यांवर गुणकारी उपाय

गरमीमध्ये ब्लड शुगर नियंत्रणात कसे ठेवता येईल?

उन्हाळा असो किंवा हिवाळा, मधुमेहग्रस्त रुग्णांनी नेहमी आपल्या आहाराची काळजी घ्यायला हवी. डॉक्टरांनी ज्या गोष्टी खायला सांगितल्या आहेत, त्या गोष्टींचं वेळेवर सेवन करावे. यासह शरीराची हालचाल महत्वाची. व्यायाम वेळेवर करत राहा.

आहार आणि दिनचर्यामध्ये एकसमानता असावी. पुरेशी झोप घ्यावी आणि तणावापासून दूर राहावे. ताणतणाव दूर करण्यासाठी योग, ध्यान करा. जेवणात मोसमी भाज्यांचा अधिक वापर करा. तळलेले पदार्थ, फास्ट फूड, जंक फूड, सॅच्युरेटेड फूड खाणे टाळा.

टॅग्स : हेल्थ टिप्समधुमेहआरोग्य