Join us   

सतत काम आणि दगदग, खूप थकवा आला? डॉक्टरांचा 'हा' सल्ला वाचा, कलकल कमी आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2024 11:36 AM

how to overcome fatigue and tiredness easy Ayurveda remedies : प्रमाणापेक्षा जास्त ताण झाला तर शरीरावर आणि मनावर त्याचा भार येतो आणि मग समस्या निर्माण होतात...

डॉ. पौर्णिमा काळे

आयुर्वेद आणि योगतज्ज्ञ

आधुनिक जीवनशैलीमुळे गेल्या काही वर्षांत सर्वच वयोगटातील व्यक्तींच्या शारीरिक आणि मानसिक ताण-तणावात वाढ झाल्याचे चित्र आहे. महिलांमध्ये तर हा तणाव खूप जास्त प्रमाणात असल्याचे दिसते. हा तणाव प्रमाणात असेल तर आपल्याला त्याचे फारसे परीणाम जाणवत नाहीत. पण तो प्रमाणापेक्षा जास्त झाला तर शरीरावर आणि मनावर त्याचा भार येतो आणि मग आरोग्याच्या आणि मानसिक समस्या समस्या निर्माण व्हायला सुरुवात होते. आता या ताणाचे नियोजन करायला हवे असे वारंवार सांगितले जाते. पण ताणाचे नियोजन करायचे म्हणजे नेमके काय करायचे असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडू शकतो. तर ताण कमी करण्यासाठी आयुर्वेद, योग, प्राणायाम आणि ध्यान हे उपाय प्रभावी ठरतात. याशिवाय आयुर्वेदात तणाव कमी करण्यासाठी काही खास उपचार सांगितले आहेत, ज्यामध्ये शिरोधारा, पादाभ्यंग आणि संपूर्ण शरीरासा मसाज यांचा समावेश आहे. या उपायांबद्दल विस्ताराने समजून घेऊया (how to overcome fatigue and tiredness easy Ayurveda remedies)...

शारीरिक तणाव दूर होण्यासाठी

(Image : Google)

१. शिरोधारा (Shirodhara):

शिरोधारा हा आयुर्वेदातील अत्यंत प्रभावी उपचार आहे, ज्यामुळे मानसिक तणाव आणि चिंता दूर होतात. या उपचारात तिळाचे तेल किंवा औषधी तेल नितळ धारेत कपाळावर ओतले जाते. शिरोधारा केल्याने मेंदू शांत होतो, झोप सुधारते आणि ताणतणावाचा नाश होतो. हा उपचार चित्तशुद्धी आणि शांती मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतो.

२. पादाभ्यंग (Padabhyanga):

पादाभ्यंग म्हणजे तेलाने पायांचे मालीश करणे. या उपचारामुळे पायांमधील ताठरपणा, तणाव कमी होतो आणि संपूर्ण शरीराला विश्रांती मिळण्यास मदत होते. पादाभ्यंगामुळे रक्ताभिसरण सुधारते, मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो आणि मानसिक शांतता मिळते. हा उपचार नियमित केल्यास अनिद्रा, चिंता, तणाव दूर होतात.

३. संपूर्ण शरीर मसाज (Abhyanga):

आयुर्वेदानुसार, संपूर्ण शरीरावर तिळाचे तेल, शतधौत घृत किंवा औषधी तेलाने मालीश करणे शरीरातील ताण दूर करण्यास मदत करते. अभ्यंगामुळे शरीरातील दोष सुधारण्यास मदत होते. यामुळे त्वचा सतेज होते, तणाव दूर होतो.  तसेच शरीरातील स्नायू मोकळे होण्यासाठी आणि मन शांत होण्यासाठीही याचा उपयोग होतो.

मानसिक तणाव दूर होण्यासाठी

१. अनुलोम-विलोम:

तणाव कमी करण्यासाठी हा प्राणायाम उत्तम आहे. यात योग्य प्रकारे श्वास घेतल्याने शरीरात प्राणवायूचा पुरवठा वाढतो आणि तणावग्रस्त परिस्थितीतही मन स्थिर राहते.

२. भ्रामरी प्राणायाम:

या प्राणायामाने मेंदूला शांतता मिळते आणि आनंदी हार्मोन्स (डोपामाइन, सेरोटोनिन) वाढतात, ज्यामुळे मन शांत राहते आणि तणाव कमी होतो.

३. शीतली प्राणायाम:

ही प्राणायाम क्रिया तणाव कमी करून शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतो. तणावग्रस्त परिस्थितीत हा प्राणायाम प्रकार अत्यंत उपयुक्त ठरतो.

(Image : Google)

ध्यानाचा तणावावर परिणाम:

ध्यान हा तणाव कमी करण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. नियमित ध्यानामुळे मन शांत होते, विचारांमध्ये स्थिरता येते आणि तणावाचा प्रभाव कमी होतो. श्वासावर लक्ष केंद्रित करून केलेले ध्यान तणावग्रस्त मनाला शांती देते. शरीरातील विविध ऊर्जा केंद्रांवर लक्ष केंद्रित करून चक्रध्यान केले जाते. हे तणाव दूर करण्यासाठी उपयुक्त आहे, विशेषतः हृदय चक्र आणि आज्ञा चक्र ध्यानाने आनंदी हार्मोन्स सक्रिय होतात आणि तणाव दूर होतो.आपल्या शरीरात आनंदी होण्यासाठी डोपामाइन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन, आणि एंन्डोर्फिन हे चार प्रमुख हार्मोन्स कार्य करतात. योग, प्राणायाम आणि ध्यानाच्या सरावाने हे हार्मोन्स सक्रिय होतात, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि मनात आनंद निर्माण होतो.

आयुर्वेदिक उपाय:

१. अश्वगंधा:

अश्वगंधा हा आयुर्वेदातील तणाव कमी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला घटक आहे. यामुळे शरीरातील तणाव दूर होतो आणि मनावरचा दबाव कमी होतो.

२. ब्राम्ही:

ब्राम्ही ही औषधी वनस्पती मेंदूची कार्यक्षमता वाढवते आणि तणाव कमी करण्यास मदत करते.

३. तुळस:

तुळशीच्या पानांचा चहा तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. तुळस मनःशांती मिळविण्यासाठी आयुर्वेदात अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते.

४. दूध आणि हळद:

रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध आणि हळद सेवन केल्याने शरीराला शांतता मिळते आणि तणाव कमी होतो.

(Image : Google)

५. अरोमाथेरपी:

चंदन, लॅव्हेंडर यांसारखे सुगंधी तेल शरीरातील तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त असतात.

६. तूपाचा वापर:

दररोज एक चमचा तूप सेवन केल्याने तणाव दूर होतो आणि शरीरातील वात दोष शांत होतो.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलघरगुती उपाय