Join us   

Heart Attack : ऐन तारुण्यात हार्ट अटॅक येण्याची ५ कारणं, जरा स्वत:वर प्रेम करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2022 1:38 PM

How to Prevent From Heart Attack : हार्ट अटॅक येण्याचे नेमके कारण अद्याप समजले नसले तरी चुकीची जीवनशैली हेच याचे मूळ आहे, त्यामुळे जीवनशैलीत बदल गरजेचा आहे.

ठळक मुद्दे ताणविरहीत आयुष्य जगण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा. व्यायाम, आहार, झोप यांसारख्या गोष्टींकडे सुरुवातीपासून लक्ष दिले तर अचानक आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाहीत.

हार्ट अटॅक ही अशी गोष्ट आहे की काही क्षणात आपलं आयुष्य होत्याचं नव्हतं होतं. आपल्याला काही कळायच्या आत त्रास सुरू होतो आणि आयुष्य संपतं. पूर्वी हार्ट अटॅक येण्याचे वय हे साधारण ६० च्या पुढे होते पण आता ते वय ४० पर्यंत आले आहे. त्यामुळे कमी वयात हृदय कमकुवत होणे ही आरोग्याच्यादृष्टीने नक्कीच चिंताजनक बाब आहे. आपल्या जीवनशैलीत झालेले बदल हे यामागील सर्वात मोठे कारण असून आपण शारीरिक आणि मानसिक आरोग्याची योग्य पद्धतीने काळजी घेत नसल्याने हा आजार आपले आयुष्य संपवण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. भारतात २०२० पर्यंत सर्वाधिक मृत्यू हे हार्ट अटॅकने होणार असल्याचं प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सी.एन. मंजुनाथन यांचं म्हणणं आहे. यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करण्याची आवश्यकता असून वेळीच लक्ष न दिल्यास हा प्रश्न गंभीर होईल असं त्यांचं म्हणणं आहे.  

(Image : Google)

हार्ट अटॅक म्हणजे काय? 

हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये काही कारणाने ब्लॉकेजेस झाले तर हा रक्तपुरवठा अनियमित होतो. त्यामुळे हृदयाच्या कामात अडथळा निर्माण होतो. ही समस्या साधारणपणे लक्षात येत नसल्याने वयाच्या तिशीनंतर दर एक ते दोन वर्षांनी मेडिकल चेकअप करणे आवश्यक आहे. या माध्यमातून आपल्याला काही त्रास असल्यास तो वेळीच लक्षात येतो आणि उपचार करणे सोपे होते. रक्ताच्या माध्यमातून हृदयाला पुरेसा ऑक्सिजन पुरवठा झाला नाही तर ही समस्या उद्भवते. त्यामुळे तुम्हाला लठ्ठपणा, बीपी, मधुमेह यांसारख्या आरोग्याच्या समस्या असतील तर वेळच्यावेळी तपासण्या आणि औषधोपचार करणे गरजेचे आहे.  हार्ट अटॅक अत्यंत तीव्र किंवा मध्यम स्वरूपाचा असतो, पहिल्या तासात रुग्णाची परिस्थिती अत्यंत नाजूक आणि गंभीर असते. यावेळेत योग्य उपचार मिळाले तर रुग्णांचा जीव वाचू शकतो.  

हार्ट अटॅकची कारणे 

१. अपुरी झोप

पूर्वी ९ ते १० वाजता झोपून सकाळी लवकर उठण्याची पद्धत होती. आता कामाच्या वेळा, सोशल मीडियाचे व्यसन आणि इतर गोष्टींमुळे आपल्यातील बहुतांश लोक हे मध्यरात्री झोपतात. मात्र याचा शरीरावर विपरित परिणाम होतो. हे आपल्या लक्षात येत नाही आणि मग अचानक आरोग्याच्या तक्रारी उद्भवल्या की आपले डोळे उघडतात.

२. चुकीचा आहार

हृदयरोगासाठी कोलेस्टेरॉल हा महत्त्वाचा घटक कारणीभूत असतो. मैदा, तेल, मसालेदार पदार्थ, साखर, फॅटी फूड यांसारख्या गोष्टींमुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येऊन हृदयरोगाची समस्या उद्भवते. 

३. व्यायामाचा अभाव 

दिवसभर बसून काम असल्याने शरीर एकप्रकारे आखडते. शरीराला पुरेशी हालचाल नसल्याने खाल्लेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन होत नाही. व्यायामाला वेळच नाही असे कारण अनेकदा दिले जाते. मात्र त्याचा शरीरावर अतिशय वाईट परिणाम होतो आणि हृदयविकारासारख्या समस्येला ऐन तारुण्यात सामोरे जाण्याची वेळ येते. 

(Image : Google)

४. अनियमित जीवनशैली 

हल्ली कामाचा ताण इतका जास्त आहे की रात्री उशीरापर्यंत ऑफीसचे काम केले जाते. त्यामुळे पुरेशी झोप होत नाही. जेवणाच्या वेळा अनियमित असतात. अशा कोणत्याच गोष्टींच्या वेळा निश्चित नसल्याने आयुष्याला शिस्त राहात नाही. त्यामुळे अॅसिडीटी, डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात. सुरुवातीला लहान वाटणाऱ्या या समस्या कालांतराने उग्र रुप धारण करतात. 

५. मानसिक ताण 

गेल्या काही वर्षात जग जवळ आले असले तरी मानसिक ताणांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त वाढ झाली आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्य़ंत सगळ्यांनाच विविध टप्प्यावर असणारे मानसिक ताण हे नकळत आपल्या हृदयावर परिणाम करतात. त्यामुळे ताणविरहीत आयुष्य जगण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलहृदयविकाराचा झटकाहृदयरोग