Join us   

डायबिटीस असेल तर दिवाळीत गोड - पदार्थ खाताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, दिवाळीत शुगर वाढणार नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2023 3:59 PM

How To take care of health in Diwali if you have Diabetice problem : दिवाळीच्या सणाचा आनंद लुटायचा आणि तब्येत चांगली ठेवायची तर काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी.

दिवाळी म्हटल्यावर फराळ, एकमेकांकडे जेवायला गेल्यावर गोडधोडाचे जेवण, तळलेले खाणे हे ओघानेच आले. वर्षातील सर्वात मोठा सण असल्याने आणि सगळे एकत्र आलेले असल्याने नकळत नेहमीपेक्षा चार घास जास्तच खाल्ले जातात. डायबिटीस असणाऱ्यांना गोड खाण्यावर बंधने असल्याने एरवी आपण ती बंधने पाळतो, पण दिवाळीच्या दरम्यान मात्र ही बंधने पाळली जातातच असे नाही. गोड, तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता असते. दिवाळीत गोड, तेलकट, मैद्याचे  पदार्थ समोर असल्याने नकळत ते जाता येता तोंडात टाकले जातात. मात्र तुम्हाला शुगर किंवा कोलेस्टेरॉलची समस्या असेल तर हे खाणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते. त्यामुळे दिवाळीच्या सणाचा आनंद लुटायचा आणि तब्येत चांगली ठेवायची तर काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी (How To take care of health in Diwali if you have Diabetice problem). 

१. एकावेळी एकच मिठाई योग्य प्रमाणात खा

आपल्यासमोर इतर लोक गोड खात असतील की नकळत आपल्यालाही गोड खाण्याची इच्छा होते. हे जरी स्वाभाविक असले तरी आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊन आपल्या आहारावर नियंत्रण ठेवायला हवे. डायबिटीस असेल तरी गोड खायला हरकत नाही पण ते योग्य प्रमाणात खायला हवे. म्हणजे दिवसातून एकदा गोड खायला हरकत नाही. तसेच जास्त फॅटस असणारे पदार्थ एकदा खाल्ले असतील तर ते दिवसभरात परत खाऊ नयेत. दिवसभराच्या आहाराचे योग्य पद्धतीने नियोजन केले तर आरोग्याला त्रास होत नाही. 

(Image : Google )

२. व्यायाम अवश्य करावा

आपण नेहमीपेक्षा ४ घास जास्त खाल्ले किंवा गोडाचे जास्त खाल्ले तर शरीरातील फॅटस आणि शुगर साहजिकपणे वाढते. अशावेळी नेहमीपेक्षा थोडे जास्त चालले किंवा थोडा जास्त व्यायाम केला तरी शरीरातील हे फॅटस बर्न होतात आणि आपल्याला या जास्तीच्या खाल्लेल्या गोष्टींचा त्रास होत नाही. 

३. जेवणाच्या वेळांकडे लक्ष द्या

शुगर असलेल्या व्यक्तींना वेळच्या वेळी इन्शुलिनचे इंजेक्शन घेणे, भूक लागलेली असताना वेळच्या वेळी खाणे, औषधे वेळेवर घेणे आवश्यक असते. यामध्ये पुढे-मागे झाल्यास शुगर कमी किंवा जास्त होऊ शकते. सणावारांच्या दिवशी बरेच जण एकत्र आल्याने वेळा पुढे मागे होणे, औषधे घेण्यास विसरणे असे होऊ शकते. मात्र त्याकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे. 

(Image : Google )

४. शुगर फ्रि पदार्थांपासून दूर राहा 

हल्ली बाजारात शुगर फ्रि पदार्थांचा सुळसुळाट असल्याचे दिसते. डायबिटीसच्या रुग्णांच्या संख्येत गेल्या काही वर्षात वेगाने वाढ झालेली असल्याने शुगर फ्री मिठाई, पेय असे बरेच प्रकार बाजारात मिळतात. मात्र यामध्ये आर्टीफिशियल साखर वापरलेली असते. अशी साखर नेहमीच्या साखरेइतकीच आरोग्यासाठी घातक असते आणि त्यामुळे कॅलरीजचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे हे पदार्थ खाताना त्यातील घटकांची आधी नीट माहिती घ्यायला हवी. 

 

टॅग्स : दिवाळी 2023आहार योजनामधुमेह