गणपती म्हणजे वर्षातला मोठा सण. या सणाच्या निमित्ताने गणपतीचे डेकोरेशन, महिलांना घरातली साफसफाई, तयारी तर तरुणांना ढोल वाजवण्यासाठी जागरणं होतात. इतकंच नाही तर सार्वजनिक गणपतींचे दर्शन घेण्यासाठीही अनेक जणं संध्याकाळनंतर बाहेर पडतात. हे दिवस मज्जा-मस्तीचे आणि नातेवाईक- मित्रमंडळी यांनी एकत्र येण्याचे असले तरी या काळात होणारी जागरणं आणि रुटीनमध्ये होणारा बदल याचा आरोग्यावर परीणाम होऊ शकतो. जागरणं, खाण्या-पिण्याच्या वेळा, त्यात बदलते वातावरण याचा शरीरावर परीणाम होतो आणि मग शेवटी पचनशक्तीवर त्याचा परीणाम होतो. झोप पूर्ण झाली नाही की अॅसिडीटी होते, तर खाण्याच्या वेळा चुकल्या की पोट पचनक्रियेवर त्याचा परीणाम होतो. पोटाचे आरोग्य बिघडले की अस्वस्थता, डोकेदुखी, प्रतिकारशक्ती कमी होणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे एकतर जास्त प्रमाणात जागरणं न करणे हा उत्तम उपाय आहे. पण जागरण झालेच तर काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे (How To Take care of your health in Ganpati Festival Sleepless night).
१. आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे
जागरण झालं असेल तर अशावेळी हलका आणि सहज पचेल असा आहार घ्यायला हवा. मसालेदार, तेलकट, जंक फूड किंवा पोटाला जड पडतील असे पदार्थ जागरणानंतर खाल्ले तर पचनशक्तीवर ताण येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे दही, ताक, दूध, फळं, भात असे हलके पदार्थ खाणं केव्हाही चांगलं.
२. झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करा
रात्री उशीरा झोपलो तरी सकाळी उशीरा उठावे. ते शक्य नसेल तर दुपारी तरी थोडा वेळ आवर्जून पॉवर नॅप किंवा छोटी डुलकी काढायलाच हवी. सलग जागरण न करता एक किंवा २ दिवसांनी जागरण झाले तरी चालेल असे पाहावे. किमान सुट्टीच्या दिवशी तरी जास्तीत जास्त राहीलेली झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे शरीराच्या सिस्टीमवर त्याचा ताण येणार नाही आणि आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.
३. चहा-कॉफी आणि व्यसने
अनेकदा आपल्याला ताण आला किंवा डोके दुखत असेल की आपण सहज चहा किंवा कॉफी घेतो. यामुळे आपल्याला तात्पुरते बरे वाटते पण नंतर त्याचा जास्त त्रास होतो. बहुतांश पुरुष सिगारेट, तंबाखू, गुटखा किंवा दारु यांसारखी व्यसने करतात. जागरण आणि व्यसन हे एकत्रित असेल तर त्याचा शरीरावर दिर्घकालिन वाईट परीणाम होतो हे वेळीच लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे शक्यतो चहा-कॉफी घेणे किंवा व्यसने टाळणे केव्हाही उत्तम.