Join us   

दिवाळीत फटाके उडवताना भाजले तर काय कराल? ५ उपाय, डॉक्टर सांगतात, लहान मुलांना सांभाळताना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2023 4:22 PM

How To take care while enjoying fire crackers 5 Remedies if you get burned : फटाक्यांमुळे आनंदात भर पडते हे जरी खरं असलं तरी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांतही भर पडते

डॉ. प्रमोद जोग 

दिवाळीत नवीन कपडे, आकाशकंदील, फराळ यांचे जसे अप्रूप असते तसेच लहान मुलांना फटाके फोडण्याचे विशेष कौतुक असते. कळत्या वयापासून मुलं इतरांना फटाके उडवताना पाहतात आणि मग त्यांनाही आपण फटाके उडवावेत असे वाटते. पण मुलांकडे फटाके उडवताना नीट लक्ष दिले गेले नाही तर अपघात होण्याची शक्यता असते. पण असे अपघात होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी आणि झालेच तर कशाप्रकारचे प्रथमोपचार करायला हवेत याबाबत समजून घेणे महत्त्वाचे आहे. दिवाळीत फटाक्यांमुळे आनंदात भर पडते हे जरी खरं असलं तरी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांतही भर पडते हे लक्षात घ्यायला हवे (How To take care while enjoying fire crackers 5 Remedies if you get burned). 

दिवाळीनंतर बहुतांश डॉक्टरांकडे हात भाजल्याच्या किंवा शरीरावर कुठेतरी भाजल्याच्या, कानाच्या दुखण्यांच्या तक्रारी येतात. भाजणे ही फटाक्यांमुळे होणारी अगदी सामान्य अशी समस्या आहे. फटाक्यांमुळे हातपाय भाजण्याच्या, अंगावरचे कपडे पेटून किंवा फटाकाच अंगावर फुटल्याने गंभीर अपघात होण्याच्या घटनाही अगदी सर्रास घडतात. फटाका डोळ्यात गेल्याने दृष्टी गमवावी लागणे, फटाक्यांच्या एका ठिणगीने पेट घेतल्याने घराला आग लागण्याच्या घटनाही काही वेळा घडतात. भाजणेच नाही तर डोळ्यांच्या, कानांच्या आणि दम्याच्या समस्यांच्या रुग्णांची संख्याही दिवाळीनंतर वाढते. 

(Image : Google )

त्वचा भाजली असल्यास काय करायला हवं?

१. सगळ्यात आधी भाजलेला भाग पाण्याखाली धरावा म्हणजे भाजलेल्या गोष्टीची धग त्वचेच्या खालच्या थरापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे काही प्रमाणात संरक्षण होण्यास मदत होते. 

२. प्रमाणापेक्षा जास्त भाजले असेल तर अजिबात वेळ न घालवता रुग्णालयात जाणे केव्हाही सगळ्यात उत्तम. याठिकाणी आवश्यक ते उपचार वेगाने मिळू शकतात.

३. फटाके वाजवताना सैलसर, घोळदार आणि सिंथेटीक कपडे घालणे टाळा. दुपट्टा किंवा साडी नेसून फटाके पेटवू नका. फटाके उडवताना अंगाला बसतील असे सुती कपडे घालणे चांगले. 

४. अपघातानंतर भाजलेली जागा स्वच्छ सुती कापडाने झाकून मगच डॉक्टरांकडे जा. हा भाग उघडा राहीला आणि त्यावर आणखी काही घाण बसली तर त्यामध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. तसेच वारा, ऊन यांमुळेही या भाजलेल्या भागाला त्रास होऊ शकतो. 

(Image : Google )

५. जखम लहान असल्यास बर्नोल, सोफ्रामायसिन, कैलास जीवन यांसारखी घरात सहज उपलब्ध असणारी औषधे लावा. मात्र त्यावर स्वच्छ कापूस किंवा स्टरलाईज गॉज लावण्यास विसरु नका. नाहीतर या औषधांचे काही वेळाने पाणी होते आणि त्यावर घाण बसण्याची शक्यता असते.  

(लेखक बालरोगतज्ज्ञ आहेत.)  

टॅग्स : दिवाळी 2023आरोग्यहेल्थ टिप्सफटाके