सकाळी उठल्यापासून आपल्या डोक्यात ऑफीसच्या कामांची यादी सुरू होते. घरातलं सगळं आवरुन ऑफीसला पोहोचायला ९.३० किंवा १० वाजतात. तोपर्यंत आज दिवसभरात आपल्याला काय काय कामं पूर्ण करायची याचं नियोजन आपल्या डोक्यात पक्क झालेलं असतं. मग ऑफीसला गेल्यावर आपण थोडं फ्रेश होतो आणि लगेच कामाला सुरुवात करतो. अनेकदा आपण कामाला बसलो की आपल्याला पाणी प्यायचंही भान राहत नाही (How To Take Healthy Breaks at Work).
कधी कधी कामाचा इतका लोड असतो की दुपार झालेली आणि जेवायची वेळ झालेलीही आपल्याला कळत नाही. सतत खुर्चीत बसून आपले डोळे, हात, पाठ, मान अवघडून जाते आणि आपल्याला एकप्रकारचा शीण येतो. हा शीण घालवण्यासाठी कधी आपण चहा-कॉफी घेतो किंवा कधी एखादी चक्कर मारुन येतो. पण त्यापेक्षा काही सोप्या गोष्टी केल्यास हा शीण निघून जाण्यास मदत होते.
१. डोळ्यांचा व्यायाम
सतत लॅपटॉपकडे पाहून डोळ्यांवर ताण येण्याची शक्यता असते. अशावेळी डोळे लॅपटॉपपासून दूर ठेवून त्याचे काही सोपे व्यायाम करावेत. डोळ्यांची बुबुळं वर-खाली, डावीकडे आणि उजवीकडे, गोलाकार फिरवावीत. यामुळे डोळ्यांचा ताण कमी होण्यास मदत होते.
२. कंटाळा आला म्हणून चहाचे ब्रेक
काम करुन कंटाळा आला की आपण चहा किंवा कॉफी घ्यायला मित्रमंडळींसोबत कँटीनमध्ये जातो. अशावेळी चहा-कॉफीबरोबरच आपण काही ना काही जंक फूडही खातो. मात्र असे करणे आरोग्याच्यादृष्टीने अजिबात चांगले नसते. त्याऐवजी एखादे फळ किंवा दाणे खाणे केव्हाही चांगले.
३. बसल्या बसल्या श्वासोच्छवास क्रिया आणि व्यायामप्रकार करा
श्वास घेणे आणि श्वास सोडणे यामुळे आपल्याला रिलॅक्स वाटण्यास मदत होते. काम करताना मधे ब्रेक घेऊन या क्रिया अवश्य करा. त्यामुळे कामाचा ताण निघून जाण्यास मदत होईल. उभे राहून किंवा खुर्चीत बसून काही सोपे योगा प्रकार अवश्य करा.