Join us   

शरीराला रोज किती ग्रॅम प्रोटीनची गरज असते? आज तुम्ही किती प्रोटीन खाल्ले, असे ठेवा रेकॉर्ड...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2023 1:57 PM

How To Track Your Daily Protein Intake : शरीराची प्रोटीन्सची गरज लक्षात घेऊन त्यानुसार आहारात बदल करायला हवेत...

उत्तम आरोग्यासाठी आहारात नियमितपणे प्रोटीन्स घेणे आवश्यक असते. लहान मुलांची शारीरिक, बौद्धिक वाढ चांगली व्हावी यासाठी त्यांच्या आहारात प्रोटीनचे प्रमाण जास्त असायला हवे. हाडांच्या बळकटीसाठी, स्नायूंची ताकद वाढण्यासाठी, शरीराची ताकद भरुन येण्यासाठी, प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी शरीराला प्रोटीन्सची आवश्यकता असते. शरीराची योग्य पोषण व्हावे यासाठी आपल्याला प्रोटीन, जीवनसत्त्वे, खनिजे, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके अशा सगळ्या घटकांची योग्य प्रमाणात आवश्यकता असते. हे सगळे घटक मिळाले तरच आपले शरीर सुदृढ राहू शकते. लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती किंवा व्यायाम करणाऱ्यांनी आहारात नियमितपणे प्रोटीन्स घेणे आवश्यक असते (How To Track Your Daily Protein Intake). 

कसे ठेवायचे प्रोटीनचे रेकॉर्ड

आपण आहारात प्रोटीनचा समावेश करतो, पण आपल्या शरीराला ते पुरेसे आहे की नाही हे मात्र आपण पाहतोच असे नाही. पण आपण घेत असलेल्या प्रोटीनचे योग्य पद्धतीने रेकॉर्ड ठेवले तर त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अमिता गद्रे हे रेकॉर्ड कसे ठेवायचे याबाबत महत्त्वाची माहिती देतात. यासाठी आपण घेत असलेल्या आहाराची योग्य पद्धतीने डायरी मेंटेन करायला हवी असे त्यांचे म्हणणे आहे. यामध्ये आपण सकाळी उठल्यापासून काय आणि किती प्रमाणात खातो याची नोंद ठेवायला हवी. यामुळे खात असलेली प्रत्येक गोष्ट ट्रॅक करणे सोपे जाते. त्यानुसार तुमचे वय, लिंग, वजन, उंची यांच्याशी त्याची तुलना करणे सोपे जाते. आपल्याला आपल्या वजनाइतक्या ग्रॅमच्या प्रोटीन्सची आवश्यकता असते. म्हणजेच आपले वजन ५० किलो असेल तर दररोज आपण ५० ग्रॅम प्रोटीन आहारातून घ्यायला हवे. 

(Image : Google)

खालील लक्षणे सांगतात, शरीरातील प्रोटीनची कमतरता 

१. खूप थकवा किंवा ताण येणे

२. स्नायू कमकुवत झाल्यासारखे वाटणे किंवा दुखणे

३. केस गळती

४. नखे ठिसूळ होणे

५. प्रतिकारशक्ती कमी होणे म्हणजेच सतत आजारी पडणे

६. लक्ष केंद्रित न करु शकणे

७. सतत मूड स्विंग होत राहणे

ही सगळी लक्षणे इतर काही कारणांनीही होऊ शकतात. पण शरीरातील प्रोटीनची पातळी लक्षात येण्यासाठी त्याचे योग्य पद्धतीने रेकॉर्ड मेंटेन करणे अतिशय आवश्यक असल्याचे आहारतज्ज्ञ गद्रे यांचे म्हणणे आहे.  त्यामुळे आपण रोजच्या रोज किती प्रोटीन्स खातो हे लक्षात येण्यास मदत होते. त्यामुळे आहारात काय आणि कसे बदल करायचे याबाबत आहारतज्ज्ञांना ठरवणे सोपे होते.    

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलआहार योजना