प्रत्येक घरात दररोज भाज्या, फळं यापैकी काहीतरी आणलं जातं, धुतलं जातं आणि चिरून खाल्लं जातं.. वरवर पाहता ही आपल्या सगळ्यांकडूनच अगदी सहज होऊन जाणारी क्रिया... म्हणूनच रोजचंच तर आहे, यात काय सिरिअसली करायचं.. असा विचार करून अनेक जणी फळं, भाज्या धुणं ही गोष्ट फार गांभीर्याने घेत नाहीत आणि त्याकडे फारसं लक्षही देत नाहीत. यातून अनेक आजार होतात, पण हे आजार नेमके कशामुळे होत आहेत, हेच समजत नाही. म्हणूनच फळं- भाज्या धुणं (How to wash vegetables properly) ही नेहमीचीच क्रिया थोडी विशेष लक्ष देऊन करा.
फळं- भाज्या धुताना या नेहमीच्या चुका टाळा... (avoid these 3 mistakes while washing vegetables) १. पाण्याच्या धारेखाली व्यवस्थित धुवा.. अनेक जण एखादं फळ हातात घेतात आणि एवढ्याशा पाण्यात ते बुचकळतात आणि लगेच ते चिरायला घेतात किंवा मग पटकन तोंडात टाकतात. पण ही फळं किंवा भाज्या धुण्याची अतिशय चुकीची पद्धत आहे. फळावर किंवा भाजीवर नुसतं पाणी शिंपडल्याने त्यावरचे किटाणू, जंतू मरत नाहीत. ते फळ किंवा भाजी खाण्यासाठी सुरक्षित व्हावी, असं वाटत असेल तर पाण्याच्या धारेखाली ते धरा आणि अगदी खळखळ पाण्याने स्वच्छ करा..
२. फ्लॉवर, कोबी कशा धुता? (how to wash cauli flower and cabbage) चिरल्यानंतर भाज्या धुवू नये, हे खरे असले तरी फ्लॉवर, कोबी या भाज्या चिरल्यानंतरच धुवाव्या लागतात. फ्लॉवर चे काप करा आणि त्यानंतर ते धुण्यासाठी कडक पाण्यात टाका. कुणी कुणी फ्लॉवरचे काप करतं आणि ते उकळत्या पाण्यात टाकतं. फ्लॉवर आपण वापरतो पण पाणी मात्र फेकून देतो. त्यामुळे मग उकळत्या पाण्यासोबत फ्लॉवरचे गुणधर्मही फेकून दिले जातात. त्यामुळे फ्लॉवर धुण्यासाठी कडक पाणी वापरा. उकळतं पाणी नाही. तसेच कोबी चिरल्यानंतर ती एखादा मिनीट थंड पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर ती भाजी करण्यासाठी वापरा.
३. भाज्या धुतल्यानंतर पुसता का? भाज्या धुतल्यानंतर त्या पुसून घेणंही गरजेचंच आहे. पण भाज्या धुतल्यानंतर तुम्ही त्या कशा पुसता हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. भाज्या धुण्यासाठी तुम्ही जो कपडा वापरता तो स्वच्छ आहे ना, हे आधी तपासा. बऱ्याचदा भाज्या धुण्यासाठी वापरलेला कपडा कित्येक दिवसांपासून धुतलेला नसतो. त्यामुळे कधी कधी स्वच्छ भाज्यांना या कपड्यावरचेच जंतू लागू शकतात. त्यामुळे भाज्या धुतल्यानंतर त्या अवश्य पुसा पण कपडा स्वच्छ आहे ना याकडे लक्ष द्या. किंवा मग धुतलेल्या भाज्या पुसण्यासाठी सरळ पेपर नॅपकीन वापरा.