कर्करोग ही जगभरातील वाढत असलेली समस्या आहे. कर्करोगाचे नेमके कारण आणि त्यावर नेमके उपाय शोधण्यात शास्त्रज्ञांना पुरेसे यश आले नसल्याने या आजाराने मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आजही जास्त आहे. भारतातही गेल्या काही वर्षात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढत असून महिला वर्गामध्येही ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशय मुखाचा म्हणजेच सर्व्हायकल कॅन्सर होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. भारतात दरवर्षी १ लाख २३ हजार महिलांना हा कर्करोग झाल्याचे निदान होते तर ६७ हजार महिलांचा या आजारामुळे मृत्यू होतो. मात्र हे प्रमाण आटोक्यात यावे यासाठी भारतात लवकरच स्वदेशी बनावटीची लस दाखल होणार असून प्रत्येक तरुणीने ही लस अवश्य घ्यायला हवी (Hpv Cervical Cancer Serum Vaccine Will Be Available Soon In Indian Market).
पुण्यातील सिरम इन्स्टीट्यूटमध्ये या लसीचे संशोधन मागील काही काळापासून सुरू असून काही महिन्यातच ही लस रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे. गर्भाशय कर्करोगाच्या (Cervical Cancer Vaccine)रुग्णांसाठी सीरम इन्स्टिट्यूटने 'क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस' (HPV)ही स्वदेशी लस विकसित केली असून त्याच्या चाचण्या सुरू होत्या. मात्र आता त्या लशीच्या निर्मितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून सामान्यांसाठी एप्रिल ते मे २०२३ च्या दरम्यान ही लस उपलब्ध होणार आहे. भारतात गर्भाशय मुखाच्या कर्करोग होणाऱ्या महिलांचे आणि त्यामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही जास्त असल्याने ही लस नक्कीच प्रभावी ठरेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. युरोप, अमेरिकेमध्ये ही लस उपलब्ध असून त्याची किंमत जास्त असल्याने भारतात त्याचा वापर फारसा होत नव्हता. मात्र आता स्वदेशी बनावटीच्या लशीबाबात महिलांमध्ये जागृती करण्याची आवश्यता आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
याबाबत पुण्यातील प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. शैलेश पुणतांबेकर म्हणाले, सध्या भारतात महिलांमध्ये होणाऱ्या कर्करोगांपैकी २० टक्के कर्करोग हा गर्भाशय मुखाचा कर्करोग असतो. पण यापासून आपला बचाव करायचा असेल तर प्रत्येक मुलीने पाळी आल्यावर आणि लैंगिक संबंधांच्या आधी अशी २ वेळा ही लस घ्यायलाच हवी. त्यामुळे महिलांचा सर्व्हायकल कॅन्सरपासून नक्कीच बचाव होऊ शकेल. ८० टक्के सर्व्हायकल कॅन्सर हे HPV या व्हायरसमुळे होतात, लैंगिक संबंधांच्या वेळी हा व्हायरस पुरुषांकडून संक्रमित होऊन महिलांना या कॅन्सरचा धोका उद्भवतो. युरोपमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण १५ टक्के होते ते आता या लसीमुळे ३ टक्क्यांवर आले आहे. तर अमेरिकेतही हे प्रमाण लसीमुळे २ टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे इतर लसी ज्याप्रमाणे लहान वयात दिल्या जातात, त्याचप्रमाणे वयात येणाऱ्या मुलींना शाळांमधूनच ही लस सक्तीची करायला हवी.