डॉ. दाक्षायणी पंडित
वर्षभरापासून पाळी अनियमित झाल्याने वैतागलेली वैशाली स्त्रीरोगतज्ञांकडे गेली. डॉक्टरांनी तिची आतून तपासणी केली व गर्भाशयाच्या मुखावर एक छोटीशी गाठ असल्याचं तिला सांगितलं. वैशाली घाबरलीच. डॉक्टर म्हणाले, "आपण त्या गाठीचा तुकडा काढून तपासणी करून घेऊ.” दुसऱ्या दिवशी वैशालीच्या गर्भाशयमुखावरील गाठीचा तुकडा काढून तपासणीसाठी पाठवून दिला. पाच दिवसांनी तपासणीचा अहवाल दाखवायला ती डॉक्टरांकडे गेली. अहवाल वाचल्यावर ते म्हणाले, “घाबरू नका पण अहवालानुसार ही कर्करोगाची गाठ आहे. ती आपल्याला लवकरात लवकर काढून टाकायला हवी. उद्या तुम्ही मिस्टरांना घेऊन या म्हणजे मी दोघांनाही उपचारांची एकूण योजना समजावून सांगतो.” डॉक्टरांच्या सांगण्यांनुसार वैशालीची शस्त्रक्रिया पार पडली. आता तिचे पुढील उपचार चालू आहेत (Human Papilloma Virus-HPV Cervical Cancer).
आजाराचं नाव – गर्भाशयमुखाचा कर्करोग
रोगकारक जंतू - ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस - एचपीव्ही (Human Papilloma Virus -HPV).
या विषाणूच्या शंभराहून अधिक जातींपैकी सुमारे ४० जाती संभोगाद्वारे पसरतात आणि त्यातील १८ जातींचा वरील कर्करोगाच्या निर्मितीशी संबंध असतो. शिवाय सोबतीला आणखी काही घटक उदा. लहान वयात झालेले लग्न, अनेकांशी लैंगिक संबंध, देहविक्रय करणाऱ्या व्यक्ती, मुखमैथुन, अनेक गर्भारपणे, शारिरीक स्वच्छतेचा अभाव, कुपोषण, तोंडाने घ्यायच्या गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर व आजाराविषयीच्या माहितीचा अभाव यांमुळे एचपीव्हीच्या संसर्गाचा धोका वाढतो. दोन्ही साथीदार एकमेकांशी एकनिष्ठ असल्यास कर्करोगाचा धोका अगदीच कमी असतो.
एचपीव्हीच्या काही जातींमुळे मस, चामखीळ इ. होतात. हे छोटे उंचवटे चेहरा, हात व गुप्तांगांवर येतात. काही जातींमुळे श्वसनमार्गात टॉन्सिल्स, घसा वा स्वरयंत्राला संसर्ग होतो तसेच पुरुषांना काही जातींमुळे तोंडाचा कर्करोग होतो. बहुतांश वेळा मानवी प्रतिकारशक्ती या विषाणूचे पूर्ण उच्चाटन करते. हे न झाल्यास विषाणू अनेक वर्षे टिकून राहतो. प्राथमिक अवस्थेत लक्षणरहित असणाऱ्या संसर्गाचे निदान होत नाही. गर्भाशयमुखावरील पेशींच्या आत राहून विषाणूंची संख्या आतल्या आत हळूहळू वाढत राहून पेशींमध्ये कर्करोग निर्माण होतो. या पेशीही वेगाने वाढून त्यांची गाठ निर्माण होते.
लक्षणे – विषाणू संसर्ग कर्करोगाच्या रुग्णांत कोणतीही लक्षणे निर्माण करीत नाही.
निदान-
यासाठी ३० वर्षांपुढील महिलांनी दर तीन वर्षांनी स्त्रीरोगतज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी असे सीडीसी (Centre for Disease Control, Atlanta) ही जागतिक रोगनियंत्रण संस्था सांगते. यात गर्भाशयमुखावर कापूस फिरवून त्यावर जमा झालेला स्त्राव, पेशी हे एका काचपट्टीवर फिरवतात व शास्त्रीय पद्धतीने रंगवतात. याला पॅप स्मिअर असे म्हणतात. यात विषाणूसंसर्गाने पेशीत झालेले बदल सहज दिसतात व कर्करोग कुठल्या टप्प्यावर आहे ते कळते.
उपचार –
शस्त्रक्रियेने कर्करोगाच्या पेशी असलेला भाग काढून टाकणे हाच उपचार असतो. फक्त कर्करोग कुठल्या भागावर वा कुठल्या टप्प्यात आहे यावर ते अवलंबून असते. शिवाय केमोथेरपी (कर्करोगरोधक औषधे), रेडीओथेरपी ( किरणोत्सर्गी पदार्थांचे उपचार) हेही जास्त वाढलेल्या कर्करोगासाठी करावे लागतात.
प्रतिबंध- काँडोमचा वापर संसर्ग रोखतो.
यासाठी अत्यंत प्रभावी लस उपलब्ध आहे. ९ ते २६ वर्षांपर्यंतच्या मुलींना (शक्यतो पहिल्या लैंगिक संबंधापूर्वी) ही लस देतात. लसीच्या दोन मात्रा सहा महिन्याच्या अंतराने घेतल्यास लस घेतलेल्या ९८% महिला/मुलींचे कर्करोगापासून संरक्षण होते. तर, मैत्रिणींनो, काळजी घ्या. वेळेवर लसीकरण व नियमित तपासणी (पॅप स्मिअर) चुकवू नका व स्वत:चे संरक्षण करा.
(लोखिका एम बी बी एस, एम डी. असून डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व चिकित्सा प्रयोगशाळेच्या प्रमुख निवृत्त प्राध्यापिका आहेत. )