झोपेतून उठल्यावर सर्वात आधी एक कप कडक चहा हवा. त्याशिवाय काय डोळ्यावरची झोप उडत नाही. काही जण तर झोपेतून उठल्याउठल्या पहिलं काम कोणतं करत असतील तर चहा टाकणे. मग चहा होईपर्यंत दात घासले की लगेच चहा तयार. काही जण तर बेड टी घेणेही पसंत करतात. झोपेतून उठल्यावर चहा घेण्याची सवय आपल्याला अनेक वर्षांपासून असली तरीही आहारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार उठल्या उठल्या चहा घेणे आरोग्यासाठी योग्य नसते. उलट अशाप्रकारे रिकाम्या पोटी चहा घेणे घातक ठरु शकते. त्यामुळे चहाने दिवसाची सुरवात करत असाल तर वेळीच सावध व्हा.
सकाळी चहा पिण्याचे दुष्परिणाम -
१. चहा पिऊन आपल्याला तरतरी येईल आणि त्यामुळे आपण दिवसभराच्या कामांसाठी फ्रेश होऊ असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. कारण चहा पिऊन तरतरी येण्याऐवजी चहाने उदासिनता वाढते.
२. तसेच सकाळी उठल्यावर चहा घेतल्याने त्याचा सर्वाधिक परिणाम हा आपल्या मानसिक आरोग्यावर होतो.
३. चहामुळे आपले पोट साफ होते असे आपल्याला वाटते. पण चहा गरम असल्याने मोशन क्लिअर व्हायला मदत होते. पण प्रत्यक्षात चहामुळे पोटाच्या तक्रारींमध्ये वाढ होते.
४. चहा हा शरीरातील आम्ल खवळण्यासाठी कारणीभूत असतो. त्यामुळे चहा घेतल्यावर लगेच काही झाले नाही तरी चहामुळे दिर्घकालिन अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो.
५. चहामुळे चिंता वाढणे, तणाव निर्माण होणे असे त्रासही उद्भवू शकतात.
६. जास्त गरम चहा प्यायल्यास सांधेदुखी, अंगदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात.
७. रात्रभर झोपेत आपण काहीही खाल्लेले आणि प्यायलेले नसते. त्यामुळे शरीराची एनर्जी डाऊन झालेली असते. त्यातच चहा प्यायल्यास आपण आणखी डिहायड्रेट होतो, हे आरोग्यासाठी चांगले नसते.
८. झोपेतून उठल्या उठल्या चहा पिणे दातांच्या आणि तोंडाच्या आरोग्यासाठी योग्य नसते.
चहाऐवजी काय घेऊ शकता
१. केळं हा झोपेतून उठल्यावर खाण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. यामुळे तुम्हाला एनर्जी तर मिळतेच आणि केळ्यातील घटक रिकाम्या पोटी अतिशय उत्तम कार्य करतात
२. केळ्याशिवायही चिकू, सफरचंद, पपई, पेर यांसारखी गर असलेली फळे झोपेतून उठल्यावर तुम्ही खाऊ शकता. त्यामुळे नैसर्गिक गोडवा असलेली फळे ही सकाळी उठल्या उठल्या खाण्यासाठी सर्वोत्तम गोष्ट आहे.
३. खजूर हाही सकाळी खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे. खजूर मूळात गोड असल्याने सकाळी पोटात भुकेनी खड्डा पडला असेल तर दोन ते तीन खजूराच्या बिया खाल्ल्यास एनर्जेटीक वाटू शकते.
४. बदाम, सुके अंजीर, मनुके, पिस्ता यांसारखे सुकामेव्यातील पदार्थ तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यावर नक्की खाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला बराच वेळ ताजेतवाने वाटण्यास मदत होईल.
५. झोपेतून उठल्यावर तुम्ही कपभर दूध पिऊ शकता.
६. पौष्टीक लाडू हा सकाळी उठल्या उठल्या खाण्यासाठी उत्तम उपाय आहे. यामध्ये दाण्याचा, अळईवाचा, थंडी असेल तर डिंकाचा किंवा अगदी कणकेचा, सुकामेव्याचा, खजूराचा, नाचणीचा असे लाडूचे एक ना अनेक प्रकार तुम्ही सकाळी उठल्यावर खाऊ शकता.
७. नारळपाणी हा सकाळी उठल्यावर पिण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. नारलपाण्यामुळे तुम्ही शारीरिकरित्या तर ताजेतवाने व्हालच पण मानसिकरित्या ताजेतवाने वाटायलाही नारळपाण्याची मदत होऊ शकते.