सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे घरोघरी आमरसाचा बेत होत आहे. आता आमरस म्हटलं की त्याच्या जोडीला कुरडई, भजे, पुऱ्या असे तळणाचे पदार्थ आलेच. हे पदार्थ किंवा इतर कोणतेही पदार्थ तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल टाकतो. जेवढं तेल टाकतो, ते अगदी सगळं संपतं असं होत नाही. कढईत तेल शिल्लक राहातं. मग ते तेल दुसऱ्या दिवशी आपण इतर कोणते वेगळे पदार्थ तळण्यासाठी वापरतो. पण ते वाटीभर तेल वाया जाऊ नये म्हणून केलेली ही बचत एखाद्या दिवशी तुम्हाला चांगलीच महागडी पडू शकते, अशी सूचना नुकतीच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) यांनी दिली आहे. (heating same oil again and again may increases cancer risk)
एकदा तळलेल्या तेलामध्ये पुन्हा पुन्हा पदार्थ तळत असाल तर त्याचा तुमच्या हृदयावर खूप वाईट परिणाम होतो.
कडक उन्हातून घरी आल्यावर लगेचच ३ गोष्टी चुकूनही करू नका, तब्येतीवर होईल वाईट परिणाम
तसेच तेल वारंवार गरम केल्याने त्यात अनेक विषारी घटक तयार होतात, जे तुमच्यासाठी कॅन्सरचा धोका वाढविणारं सगळ्यात मुख्य कारण ठरू शकतं, असं नुकतंच ICMR ने केलेल्या एका अभ्यासावरून स्पष्ट झालं आहे. वारंवार गरम केलेलं तेल खाल्ल्यामुळे शरीरात फ्री रॅडिकल्स तयार होतात. त्यामुळे कॅन्सरचा धोका तर वाढतोच, पण लिव्हरवर देखील खूप वाईट परिणाम होतो.
तसेच या तेलातून तयार होणारे फॅट्स तसेच ॲक्रिलामाईडसारखे घटक शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्यासही मदत करतात. त्यामुळे त्या थोड्याशा तेलाचा मोह नकोच, असं तज्ज्ञ सांगतात. याशिवाय बऱ्याच जणांना सतत बाहेरचे वडे, सामोसे असे तळलेले पदार्थ खाण्याची सवय असते.
त्यासाठी वापरण्यात आलेलं तेल तर कित्येकदा गरम केलं गेलं असेल हे सांगताच येत नाही. त्यामुळे असे पदार्थ खाणंही टाळलेलं बरं. जर तुम्हाला तळलेलं तेल वापरायचंच असेल तर ते फिल्टर करून अन्य पदार्थांमध्ये वापरा. पण ते तेल २ दिवसांपेक्षा जास्त दिवस ठेवू नका, अशी सूचनाही ICMR ने केली आहे.