बाजारात आंबा आला की घरोघरी अगदी आवडीने खाल्ली जाणारी द्राक्षं, मस्त थंडाई देणारं कलिंगड, आंबटगोड संत्री, अननस आणि लालचुटुक स्ट्रॉबेरी या सगळ्या फळांची किंमत नकळत कमी होते. कारण हापूस आंब्याचा नुसता विचार जरी मनात आला तरी मस्त केशरी सोनेरी रंगाचं अमृत फळ समोर दिसायला लागतं आणि त्याचा घमघमाट आपल्याला नकळत त्याच्याकडे खेचतो. खरंच, या अमृत फळाची चव सर्वांनी चाखायलाच हवी ! वर्षातून फक्त दीड दोन महिने उपलब्ध होणाऱ्या आंब्याला 'नाही' तरी कसं म्हणणार ! लठ्ठ आणि डायबीटीक लोकांनी सुद्धा आंब्याची मजा घ्यावी की नाही, हा आंबा किती, कधी खावा याविषयी प्रसिद्ध आहारतज्ज्ञ सुकेशा सातवळेकर काही महत्त्वाचे नियम सांगतात.
आमरसापेक्षा आंबा खाणे अधिक योग्य, कारण...
आंबा कोणत्या स्वरूपात खाल्ला जातोय याचा तब्येतीवर आणि ब्लड शुगरवर परिणाम होतो. आमरसापेक्षा आंबा चिरून खाणे चांगले. आंब्यावर जेवढ्या प्रक्रिया होतील तेवढा त्याचा ग्लायसिमीक इंडेक्स म्हणजेच ब्लड शुगर वाढण्याचे प्रमाण वाढते. मिल्कशेक किंवा आईस्क्रीम मध्ये भरपूर साखर आणि कॅलरीज असतात. पॅकबंद मँगो पल्पमध्येही साखर असण्याची शक्यता असते. आंबा पोळी किंवा आंबा बर्फी किंवा वडी भरपूर कॅलरीजमुळे टाळलेलीच बरी. साखरांबा, मोरांबा, जॅममुळे वजन आणि ब्लड शुगर हमखास वाढेल. त्यापेक्षा नैसर्गिक स्वरूपातील ताजा आंबा कापून खावा. फळांवरती प्रक्रिया करताना त्यातील अत्यावश्यक अन्नघटकांचं प्रमाण कमी होतं, फायबर्सचं प्रमाण कमी होतं. फळांचा रस काढला की त्यातील साखर रक्तात लवकर शोषली जाते आणि ब्लड शुगर वाढते.
आंबा कोणत्या वेळेला खावा?
आंबा शक्यतो सकाळी खावा. सकाळी मेटबॉलिक रेट चांगला असतो. सकाळी खाल्लेल्या पदार्थांचं पचन, चयापचय आणि वापर चांगला होतो. सकाळी शारीरिक हालचालींचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे पचनसंस्था जास्त कार्यक्षम असते. त्यामुळे आंबा दिवसा खावा, संध्याकाळ नंतर कोणतेही फळ प्रामुख्याने आंबा जास्त गोड असल्याने शक्यतो टाळावा.
आमरस खायचाच असेल तर...
बऱ्याच घरांमध्ये आमरस सुरू झाला की पोळीला लावायला भाज्यांची गरज उरत नाही. भाजी, कोशिंबीर नसल्यामुळे आमरस भरपूर खाल्ला जातो ज्यामुळे वजन वाढू शकतं. हापूस आंब्यामधून भरपूर कॅलरीज, म्हणजेच एका मध्यम आकाराच्या आंब्यातून १५० ते २०० कॅलरीज मिळतात. त्यामुळे वजन आणि ब्लड शुगर आटोक्यात ठेवायची असेल तर आमरस खाताना, जेवणातील पोळी भाताचं प्रमाण नेहेमीपेक्षा कमी करावं पण भाजी, सलाड मात्र आवर्जून खावं.
शुगर असणाऱ्यांनी किती आंबा खावा...
आमरसा मध्ये साखर, तूप घालून खायची काही जणांची पद्धत असते. पण त्यामुळे अनावश्यक कॅलरीज वाढतील हे लक्षात ठेवा. आमरसाबरोबर तळलेल्या पुऱ्यांपेक्षा फुलका खावा. भजी, वडे असे तळलेले पदार्थ आणि मैद्याचे किंवा गोड पदार्थ टाळलेलेच बरे. आंब्याचा आस्वाद सर्वांनी जरूर घ्यावा फक्त किती प्रमाणात ते आपल्या तब्येतीनुसार व्यक्तीगतरीत्या ठरवावं. ज्यांची ब्लड शुगर आटोक्यात आहे त्यांनी २-३ फोडी आंबा खायला काहीच हरकत नाही. पण प्रमाणाबाहेर ब्लड शुगर किंवा वजन असणाऱ्यांनी आपल्या डाएटीशियनच्या सल्ल्याने आंब्याचं प्रमाण ठरवावं.
आंब्यातून मिळणारे पोषक घटक
आंब्यामधून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन अ मिळतं. अँटीऑक्सिडंटस, फोलेट, व्हिटॅमिन क आणि फायबर्स मिळतात. डी के पब्लिशिंग कडून प्रसिद्ध झालेल्या 'हिलींग फूड्स' नुसार आंब्यामध्ये काही विशिष्ट एंझाइम्स असतात जे प्रोटिनच्या पचनासाठी मदत करतात. रायवळ आंब्यांमध्ये सर्वात जास्त व्हिटॅमिन अ असतं. पुरेशा प्रमाणात रायवळ आंबे खाल्ले तर वर्षभर पुरेल एवढं व्हिटॅमिन अ शरीरात साठून राहू शकतं. तेव्हा योग्य प्रमाणात आंबा खायला हरकत नाही.